नंदा देवी एक्सप्रेसमधून आपल्या पतीसोबत प्रवास करताना गूढ रित्या गायब झालेली प्रज्ञा सिंह अखेर ६ दिवसांनी सुखरूप सापडली. आता उत्तर रेल्वेने या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत खुलासा केला असून, प्रज्ञा सिंहने केवळ घरगुती वादातून रागाच्या भरात ट्रेन बदलली आणि थेट बिहार गाठले होते. रेल्वे आणि जीआरपीने संयुक्त कारवाई करत तिला मुगलसराय येथून ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक खास आवाहनही केले आहे.
नेमकं प्रकरण काय होतं?
प्रज्ञा सिंह ५ मे रोजी पती मनीषसोबत देहरादून-कोटा नंदा देवी एक्सप्रेसने (गाडी क्र. १२४०२) प्रवास करत होती. हरिद्वारच्या लक्सर स्टेशननंतर ती अचानक बेपत्ता झाली. जेव्हा गाडी मुजफ्फरनगरला पोहोचली आणि मनीषला जाग आली, तेव्हा प्रज्ञा तिच्या जागेवर नव्हती. संपूर्ण ट्रेन आणि स्टेशन शोधूनही ती न सापडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. अखेर लक्सर जीआरपीमध्ये तक्रार नोंदवण्यात आली.
बिहारमध्ये लागला शोध
गेल्या सहा दिवसांपासून रेल्वे पोलीस आणि यंत्रणांचा तपास सुरू असतानाच, ११ मे रोजी प्रज्ञाने बिहारच्या बेगुसराय येथून आपल्या आईला फोन केला. या तपासात समोर आले की, प्रवासादरम्यान प्रज्ञाचे पती मनीषसोबत काही कारणावरून जोरदार भांडण झाले होते. मनीष झोपल्यानंतर संतापलेल्या प्रज्ञाने लक्सर स्टेशनवर गुपचूप ट्रेन सोडली आणि तिकीट न काढताच बिहारला जाणारी दुसरी गाडी पकडली. बेगुसराय येथे ती आपल्या मावशीच्या घरी राहत होती.
रेल्वे प्रशासनाचा खुलासा आणि आवाहन
उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हिमांशु शेखर उपाध्याय यांनी सांगितले की, प्रवाशांची सुरक्षा हीच रेल्वेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. "प्रज्ञाच्या शोधासाठी आमची तांत्रिक टीम आणि पोलीस दिवसरात्र काम करत होते. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक ट्रॅकिंगच्या मदतीने अखेर तिला शोधण्यात यश आले," असे त्यांनी स्पष्ट केले.
या निमित्ताने रेल्वेने प्रवाशांना एक महत्त्वाची विनंती केली आहे. "प्रवासादरम्यान घरगुती वाद किंवा अन्य कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी तत्काळ रेल्वेच्या १३९ या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा," असे आवाहन रेल्वेने केले आहे. सध्या प्रज्ञाला गाझियाबादमधील तिच्या घरी सुरक्षित पोहोचवण्यात आले असून, या गूढ प्रकरणाचा सहा दिवसांनी सुखद अंत झाला आहे.
Web Summary : Pragya Singh, missing from a train, was found after six days. Railway officials revealed she changed trains due to a domestic dispute and went to Bihar. She is now safely home, and the railway urges passengers to use helpline 139 for emergencies.
Web Summary : ट्रेन से लापता प्रज्ञा सिंह छह दिन बाद मिली। रेलवे ने बताया, घरेलू झगड़े के कारण उसने ट्रेन बदली और बिहार चली गई। वह सुरक्षित घर पहुँच गई है। रेलवे ने यात्रियों से आपात स्थिति में हेल्पलाइन 139 का उपयोग करने का आग्रह किया है।