जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:23 IST2025-06-06T19:22:48+5:302025-06-06T19:23:41+5:30

जी ७ शिखर संमेलनात पंतप्रधान कार्नी यांची भेट होईल. या भेटीसाठी मी उत्सुक आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं.

PM Narendra Modi confirms G7 Summit invite from Canadian PM Mark Carney | जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन

जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन

नवी दिल्ली - कॅनडात या महिन्याच्या अखेरीस आयोजित केलेल्या G-7 शिखर संमेलनाचं आमंत्रण देण्यासाठी कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान मार्क जे कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. या फोनवरून मोदींनी कार्नी आमंत्रणाबाबत कार्नी यांचे आभार मानत त्यांना निवडणुकीतील यशाबाबतही शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून कार्नी यांच्यासोबत झालेल्या फोनवरील संवादाची माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कॅनडाचे पंतप्रधान मार्क जे कार्नी यांच्याशी फोनवरून संवाद साधून आनंद झाला. अलीकडेच कॅनडात झालेल्या निवडणुकीत कार्नी यांचा विजय झाल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले. त्याशिवाय या महिन्याच्या अखेरीस कनानस्किस इथं होणाऱ्या जी ७ शिखर संमेलनात आमंत्रित करण्यासाठी त्यांचे आभार मानले. भारत आणि कॅनडा यांच्यात जिवंत लोकशाही आणि लोकांशी संबंध आहेत. परस्पर आदर आणि सामायिक हितसंबंधांवर आधारित नवीन उर्जेने एकत्र काम करू असं त्यांनी सांगितले.

तसेच जी ७ शिखर संमेलनात पंतप्रधान कार्नी यांची भेट होईल. या भेटीसाठी मी उत्सुक आहे असंही पंतप्रधानांनी म्हटलं. हा संवाद दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. भारत आणि कॅनडा यांच्यात सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध दीर्घ काळापासून आहेत. त्यामुळे दोन्ही देशातील पंतप्रधानांच्या संवादामुळे भविष्यात सहकार्य आणि संबंध सुधारण्याची शक्यता आहे. जी ७ शिखर संमेलनात दोन्ही नेत्यांची भेट जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चेसाठी व्यासपीठ निर्माण करेल.

कॅनडात येत्या १५-१७ जून रोजी जी ७ शिखर संमेलन होणार आहे. अल्बर्टाच्या कनानस्किस येथे आयोजित या शिखर संमेलनासाठी २ आठवड्याहून कमी कालावधी राहिला असताना भारताला या कार्यक्रमाचे आमंत्रण न दिल्याने विविध चर्चा सुरू होत्या. जर भारताला या संमेलनाचं निमंत्रण दिले नसते तर २०१९ नंतर पहिल्यांदाच अशी वेळ आली असती जेव्हा भारत या शिखर संमेलनाचा भाग नसते. सामान्यत: जी ७ शिखर संमेलन आयोजित करणारा यजमान देश काही देशांना अतिथी देश म्हणून आमंत्रित करतो. कॅनडाने आतापर्यंत युक्रेन, ऑस्ट्रेलियालाही आमंत्रित केले होते. 
 

Web Title: PM Narendra Modi confirms G7 Summit invite from Canadian PM Mark Carney