Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 07:09 IST2026-04-21T07:09:03+5:302026-04-21T07:09:41+5:30
Who Is Ashwini Paul: कारागृहात कैद असलेल्या पार्टनरला भेटण्यासाठी जाताना ड्रग्जतस्कर इरफानशी ओळख झाली. पुढे याच ओळखीतून बार गर्ल असलेली अश्विनी पॉल थेट ड्रग्ज सप्लायर बनल्याची माहिती समोर येत आहे.

Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कारागृहात कैद असलेल्या पार्टनरला भेटण्यासाठी जाताना ड्रग्जतस्कर इरफानशी ओळख झाली. पुढे याच ओळखीतून बार गर्ल असलेली अश्विनी पॉल थेट ड्रग्ज सप्लायर बनल्याची माहिती समोर येत आहे. तिच्या घरातून जप्त केलेल्या ५ हजार ३० गोळ्यांमागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली असून, त्यानुसार तपास सुरू आहे. पॉलने मुंबई महानगरासह राज्यभरात मागणीनुसार पार्टी ड्रग्जचा पुरवठा केल्याचा संशय पोलिसांना आहे.
मूळची पुण्याची रहिवासी असलेली अश्विनी दहावी नापास आहे. २०१२ पासून नोकरीच्या शोधात मुंबई गाठली आणि बार गर्ल म्हणून काम करू लागली. नवी मुंबई, कल्याण करीत दोन महिन्यांपासून तिने आपले बस्तान टिटवाळा येथील पद्मावती रॉयल कॉम्प्लेक्समध्ये वळवले. १५ एप्रिल रोजी अमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) साकीनाका येथे छापा घालून २०० एक्स्टॅसी गोळ्या जप्त केल्या. हा साठा बाळगणाऱ्या इरफान अन्सारीला अटक केली. अन्सारीला यापूर्वी अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. एनसीबीने त्याला ५६ गोळ्यांसह अटक केली होती. याच गुन्ह्यात तो ४ वर्षे कारागृहात होता. गेल्या वर्षीच तो कारागृहातून बाहेर पडला आणि पुन्हा एक्स्टॅसी गोळ्यांची विक्री करताना गुन्हे शाखेच्या हाती लागला. इरफान कारागृहात असताना तेथेच पॉलचा पार्टनरही कैद होता. त्याला भेटण्यासाठी जाताना पॉलची इरफानसोबत ओळख झाली. याच ओळखीतून इरफानने जास्तीच्या पैशांचे प्रलोभन दाखवत तिला पार्टीच्या ड्रग्ज पुरवठादारांच्या साखळीत ओढले.
ड्रग पेडलरशी बोलताना व्हीओआयपीचा आधार
अश्विनी इतर तस्कर, तसेच ड्रग पेडलरशी केवळ व्हीओआयपी कॉलवरच बोलायची. व्हीओआयपी कॉल म्हणजे व्हाॅइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकाॅल यात पारंपरिक टेलिफोन लाइन्सऐवजी इंटरनेटचा वापर करून व्हॉइस कॉल केला जातो, तसेच पोलिसांनी तिच्या घरातील सर्च ऑपरेशनमध्ये तब्बल पाच किलोहून अधिक वजनाच्या एक्सटसीच्या गोळ्या जप्त केल्या. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे.
१,५०० ते २ हजारांत विक्री
अश्विनी दीड ते दोन हजारांत या गोळ्यांची विक्री करीत होती. यासाठी कॉलेज ग्रुपमधील मुले सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याचे समोर येत आहे. तिच्याकडून जप्त केलेल्या मोबाइलमधील डेटाच्या आधारे ती कोणाच्या संपर्कात होती? तसेच तिने यातून किती पैसे कमवले? याचा लेखाजोखा तपासण्यात येत आहे. तसेच ड्रग्ज पुरवठादारांच्या साखळीत दाखल झाल्यानंतर तिनेही घरातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, मीरारोडसह राज्यभरात जाळे पसरवल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, यात मोठ्या रॅकेटचा सहभाग समोर येत असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके मुंबईबाहेर रवाना झाली आहेत.