सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 21:32 IST2025-04-25T21:32:16+5:302025-04-25T21:32:38+5:30
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे.

सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
Pahalgam Terror Attack :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी(22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतप्त आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेससह सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत असल्याचे सांगितले. पण, आता काँग्रेसने या हल्ल्याबाबत सरकारला सहा प्रश्न विचारले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे, असे त्यात म्हटले आहे. पण, असे काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे देशातील लोकांना हवी आहेत.
काँग्रेसने सरकारला विचारले हे 6 प्रश्न
- सुरक्षेत चूक कशी झाली?
- गुप्तचर यंत्रणा अपयशी का ठरली?
- दहशतवादी सीमेवरुन कसे घुसले?
- 28 लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ?
- गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देणार का?
- या चुकीची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेतील का?
28 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार ?
व्हिडिओमध्ये पुढे म्हटले की, जर नोटाबंदीने दहशतवाद संपणार होता, तर अशी परिस्थिती कशी निर्माण झाली? 28 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? गृहमंत्री त्यांचे अपयश स्वीकारुन राजीनामा देतील का? पंतप्रधान इतर सर्व गोष्टींचे श्रेय घेतात, त्याप्रमाणे या हल्ल्याची जबाबदारी घेतील का? असे प्रश्न काँग्रेसने विचारले आहेत.