कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 13:35 IST2026-04-13T13:34:31+5:302026-04-13T13:35:21+5:30
कागदावर सर्व काही योग्य दाखवले जाते परंतु प्रत्यक्षात तसे नसते. जर आम्ही विरोध केला तर किरकोळ वाढ करून प्रकरण दडपले जाते असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.

कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
नोएडा - मागील ३ दिवसांपासून खासगी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. कालपर्यंत जे आंदोलक घोषणाबाजी आणि शांततेत विरोध प्रदर्शन करत होते त्यांनी सोमवारी हिंसक पाऊल उचलले. शेकडोंच्या संख्येने कर्मचारी रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. काही ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली. जाळपोळीचे प्रकारही सुरू झाले. परिस्थिती बिघडताच पोलिसांनी तातडीने मोर्चा सांभाळला. वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले.
हा वाद केवळ पगार वाढीपुरता मर्यादित राहिला नाही तर त्यामागे कर्मचाऱ्यांचा कंपनीवरचा बराच काळापासून असलेला राग, असंतोष उफाळून आला. अनेक खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या शोषणाच्या कहाण्या समोर आल्या. आंदोलक कर्मचाऱ्यांनी उघडपणे कंपनीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत धक्कादायक दावे केले. एका महिला आंदोलक कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्हाला ९ ते ११ हजार सॅलरी दिली जाते. अनेक वर्ष मेहनत केल्यानंतरही पगारात फार वाढ होत नाही. जर जास्त आवाज केला तर २००-३०० रुपये वाढवले जातात असं तिने सांगितले. तर आमच्याकडून १०-१२ तास काम करून घेतले जाते, वेतन मात्र १५ हजार मिळते. कुणी रेकॉर्ड तपासायला आले तर कर्मचाऱ्यांना २५ हजार सॅलरी दिली जाते हे सांगतात असा आरोप महिला कर्मचाऱ्याने केला.
तसेच कागदावर सर्व काही योग्य दाखवले जाते परंतु प्रत्यक्षात तसे नसते. जर आम्ही विरोध केला तर किरकोळ वाढ करून प्रकरण दडपले जाते. परंतु मूळ समस्या तशीच राहते. निश्चित वेळेपेक्षा अधिकचे काम करायला सांगतात. त्याचा योग्य मोबदला दिला जात नाही. ओव्हरटाइमचे पैसे दिले जात नाही. सुट्टीही कधीतरी दिली जाते. कुठलीही मेडिकल सुविधा नाही, सुरक्षा नाही. काम करा, पैसे कमी द्या हेच चाललेले असते असा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, या आंदोलनाची झळ केवळ नोएडात मर्यादित राहिली नाही तर फरिदाबादच्या सेक्टर ३७ मध्येही मोठ्या संख्येने कर्मचारी रस्त्यावर उतरले. अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. मदरसन कंपनीचे हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्याशिवाय औद्योगिक संस्थांमधील कामगारही काम सोडून आंदोलनात आल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन पाहून प्रशासनाने औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. त्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. परंतु तरीही कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. कागदावर सर्व नियम बनवले जातात परंतु काहीच होत नाही असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.