लिपुलेखमार्गे कैलास यात्रेवर नेपाळचा आक्षेप; काठमांडूशी सल्लामसलत केली नसल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 10:03 IST2026-05-05T10:03:12+5:302026-05-05T10:03:40+5:30

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, यात्रेचा मार्ग निश्चित करण्यापूर्वी काठमांडूशी सल्लामसलत केली नाही. भारताने सातत्याने म्हटले आहे की, लिपुलेख हा भारताचा भाग आहे.

Nepal objects to Kailash Yatra via Lipulekh; claims Kathmandu was not consulted | लिपुलेखमार्गे कैलास यात्रेवर नेपाळचा आक्षेप; काठमांडूशी सल्लामसलत केली नसल्याचा दावा

लिपुलेखमार्गे कैलास यात्रेवर नेपाळचा आक्षेप; काठमांडूशी सल्लामसलत केली नसल्याचा दावा

काठमांडू : लिपुलेख खिंडीमार्गे कैलास मानसरोवर यात्रा आयोजित करण्याच्या भारत आणि चीनच्या योजनेला नेपाळने रविवारी आक्षेप घेतला असून, तो आपला प्रदेश असल्याचा दावा केला आहे.

नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, यात्रेचा मार्ग निश्चित करण्यापूर्वी काठमांडूशी सल्लामसलत केली नाही. भारताने सातत्याने म्हटले आहे की, लिपुलेख हा भारताचा भाग आहे. भारताने जून ते ऑगस्टदरम्यान कैलास मानसरोवर यात्रा आयोजित करण्याची घोषणा केली, तेव्हा नेपाळने यात्रेला आक्षेप घेतला होता.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, १८१६ च्या सुगौली करारानुसार, महाकाली नदीच्या पूर्वेला असलेले लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी, हे नेपाळ सरकारचे अविभाज्य प्रदेश आहेत, या आपल्या भूमिकेवर नेपाळ सरकार ठाम आहे.

निवेदनानुसार, नेपाळ सरकारने यापूर्वी भारत सरकारला या भागात रस्ते बांधकाम, विस्तार, सीमा व्यापार आणि तीर्थयात्रा यांसारखे उपक्रम न राबवण्याची विनंती केली होती. नेपाळ आणि भारत यांच्यातील घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता, नेपाळ सरकार ऐतिहासिक करार, तथ्ये, नकाशे आणि पुराव्यांच्या आधारे राजनैतिक मार्गाने सीमा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे.(वृत्तसंस्था)

भारताने फेटाळला दावा

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून अनेक दशकांपासून आयोजित केल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला नेपाळने घेतलेला आक्षेप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी स्पष्टपणे फेटाळला. प्रादेशिक दाव्यांचा असा एकतर्फी कृत्रिम विस्तार अस्वीकार्य आहे, असे मंत्रालयाने म्हटले.

नेपाळच्या आक्षेपावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ३० एप्रिल रोजी जाहीर केले की, वार्षिक कैलास मानसरोवर यात्रा यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड आणि सिक्कीममधील नाथू ला खिंड या दोन मार्गांनी आयोजित केली जाईल.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, यासंदर्भात भारताची भूमिका नेहमीच सुसंगत आणि स्पष्ट राहिली आहे. १९५४ पासून लिपुलेख खिंड हा कैलास मानसरोवर यात्रेसाठी एक प्रमुख मार्ग राहिला आहे आणि या मार्गाने प्रवास अनेक दशकांपासून सुरू  आहे. ही काही नवीन घडामोड नाही. 

Web Title : लिपुलेख मार्ग से कैलाश यात्रा पर नेपाल की आपत्ति, परामर्श का दावा नहीं।

Web Summary : नेपाल ने लिपुलेख के रास्ते कैलाश मानसरोवर यात्रा योजना पर आपत्ति जताई, क्षेत्र का दावा किया और परामर्श की कमी बताई। भारत ने नेपाल के दावे को खारिज किया, 1954 से तीर्थयात्रा के लिए लिपुलेख के ऐतिहासिक उपयोग पर जोर दिया।

Web Title : Nepal objects to Kailash Yatra via Lipulekh, claims no consultation.

Web Summary : Nepal objects to India-China's Kailash Mansarovar Yatra plan via Lipulekh, claiming territory and lack of consultation. India rejects Nepal's claim, asserting Lipulekh's historical use for the pilgrimage since 1954.