चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:55 IST2026-05-15T13:53:52+5:302026-05-15T13:55:41+5:30
Miraculous Delivery: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून निसर्गाचा एक अजब चमत्कार पाहायला मिळाला आहे.

चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून निसर्गाचा एक अजब चमत्कार पाहायला मिळाला आहे. तीर्थंकर महावीर युनिव्हर्सिटी रुग्णालयात एका ३१ वर्षीय महिलेने अवघ्या पाच दिवसांच्या अंतराने चार गोंडस बाळांना जन्म दिला. पाच दिवसांच्या अंतराने चार मुले जन्माला येण्याची ही पहिलीच दुर्मिळ घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे, संबंधित महिला आणि तिचे चारही बाळ सुखरूप आहेत.
अमिना (वय, ३१) असे या मातेचे नाव असून तिने पहिल्यांदाच बाळाला जन्म दिला आहे. सुरुवातीच्या तपासण्या आणि अल्ट्रासाऊंड अहवालातच तिच्या गर्भात चार बाळे असल्याचे डॉक्टरांना समजले. या प्रसूतीमध्ये असलेले धोके लक्षात घेता डॉक्टरांनी कुटुंबीयांना पूर्वकल्पना दिली. परंतु, अमिनाचे पती अलीम आणि कुटुंबीयांनी सर्व बाळांना जन्माला घालण्याचा धाडसी निर्णय घेतला.
बाळांचा जन्म कसा झाला?
या महिलेची प्रसूती प्रक्रिया अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. अमिनाला प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर तिला ६ मे रोजी टीएमयू रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिने ९ मे रोजी पहिल्या मुलाला जन्म दिला. पहिल्या प्रसूतीनंतर पाच दिवसांनी (१४ मे) पुन्हा कळा सुरू झाल्या आणि अमिनाने एका मुलाला आणि दोन मुलींना जन्म दिला. अशा प्रकारे, पाच दिवसांच्या कालावधीत अमिनाने एकूण दोन मुले आणि दोन मुली अशा चार अपत्यांना जन्म दिला.
डॉक्टर आणि कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण
रुग्णालयातील विशेष वैद्यकीय पथक या संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून होते. रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या रुग्णालयात सामान्य प्रसूतीद्वारे अशा प्रकारे चार मुले जन्माला येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या आई आणि चारही बाळांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. पत्नी आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल पती अलीम यांनी समाधान व्यक्त केले असून, अत्यंत कठीण परिस्थितीत साथ दिल्याबद्दल डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. या चमत्कारिक प्रसूतीची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली आहे.