सिद्धार्थनगर जिल्ह्यातील जोगिया पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बूढी राप्ती नदीत सोमवारी संध्याकाळी सत्यम नायक आणि सचिन महावर या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे दोन्ही विद्यार्थी त्यांचे इतर दोन मित्र नितेश आणि विनीत यांच्यासह योगमाया मंदिराजवळील नदीत गेले होते. आंघोळ करताना सत्यम आणि सचिन यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. काठावर असलेल्या मित्रांनी माहिती दिल्यानंतर पोलीस आणि जीवरक्षक घटनास्थळी पोहोचले. तासाभराच्या शोधानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
अपघाताचा बळी ठरलेला सचिन महावर हा एमबीबीएस द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता आणि तो राजस्थानमधील सवाई माधोपूरचा रहिवासी होता. तर सत्यम नायक हा ज्युनियर रेसिडेंट (JR) होता आणि उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील कलवारी परिसरातील रहिवासी होता. चार मित्र एकत्र नदीवर गेले होते, पण दोन विद्यार्थी काठावर असल्यामुळे सुदैवाने वाचले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी अनेकदा येथे अंघोळीसाठी येतात, परंतु खोलीचा अंदाज न आल्याने ही घटना घडली
सचिन महावरच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे. सचिनचे वडील रिक्षा चालवून त्याला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न पाहत होते. जेव्हा मुलाच्या मृत्यूची बातमी राजस्थानला पोहोचली, तेव्हा वडिलांकडे सिद्धार्थनगरला येण्यासाठीही पैसे नव्हते. ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईकांनी गावात लोकांकडे पैसे मागून जमा केले. जेणेकरून ते आपल्या मुलाचा मृतदेह घेण्यासाठी उत्तर प्रदेशात पोहोचू शकतील. या बातमीने सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.
एएसपी प्रशांत कुमार प्रसाद यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच जोगिया पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जीवरक्षकांनी सुमारे दीड तासांच्या मेहनतीनंतर मृतदेह बाहेर काढले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतर विद्यार्थ्यांनी घटनास्थळीच 'सीपीआर' देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
Web Summary : Two medical students drowned in Uttar Pradesh; one's rickshaw-driver father, who dreamed of his son becoming a doctor, had to beg for money for the funeral. The tragic incident highlights the family's dire financial situation.
Web Summary : उत्तर प्रदेश में दो मेडिकल छात्रों की डूबने से मौत; एक के रिक्शा चालक पिता, जिन्होंने अपने बेटे को डॉक्टर बनाने का सपना देखा था, को अंतिम संस्कार के लिए पैसे मांगने पड़े। दुखद घटना परिवार की दयनीय वित्तीय स्थिति को उजागर करती है।