भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या फाजिल्का जिल्ह्यातील अरनीवाला-कटैहड़ा परिसरात सध्या एक गंभीर संकट उभे राहिले आहे. पाकिस्तानमधील कसूर जिल्ह्यातील चामड्याच्या कारखान्यांमधून सोडण्यात येणारे रासायनिक आणि प्रदूषित पाणी सरळ सतलुज नदीद्वारे भारतीय सीमावर्ती भागांत येत असल्याने नद्यांचे पाणी काळवंडले आहे. या विषारी पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.
आरोग्याचा प्रश्न गंभीर
नाले आणि नद्यांमधील पाणी इतके विषारी झाले आहे की, स्थानिक प्रशासनाला वॉटर वर्क्सची पाणीपुरवठा सेवाही बंद करावी लागली आहे. भूजल आधीच पिण्यायोग्य नसल्याने आणि आता नद्यांचे पाणीही प्रदूषित झाल्याने ग्रामस्थ दुहेरी संकटात सापडले आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध नसल्याने अनेक लोक आजारांच्या विळख्यात अडकले आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका माजी आरोग्यमंत्री आणि भाजप नेते सुरजीत कुमार ज्याणी यांच्या कटैहड़ा या गावालाही बसला आहे.
वॉटर वर्क्सची दुरवस्था
स्थानिक पंचायत आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सध्या पंचायत आपल्या स्तरावर नवीन बोअरवेल खोदून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हे पाणीही पिण्यायोग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर, पाणीपुरवठा केंद्रांची दुरवस्था इतकी बिकट आहे की, तिथे पशुंचा वावर वाढला असून टाक्यांमध्येही प्रचंड घाण साचली आहे. यामुळे ग्रामस्थांना नाईलाजाने विकतचे पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे.
'सरकारने आता तरी शुद्ध पाण्याचे आरओ प्लांट बसवावेत'
ग्रामस्थांनी आणि सरपंच जगतपाल भाखर यांनी सरकारकडे आता आरओ प्लांट उभारण्याची आग्रही मागणी केली आहे. "आम्ही अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला, पण आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. निवडणुकीत शुद्ध पाणी देण्याचे दिलेले आश्वासन आता तरी पूर्ण करा," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून उमटत आहे.
पंजाब सरकार काय म्हणते?
या विषयावर पंजाबचे वित्तमंत्री हरपाल चीमा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "ही समस्या जुनी आणि मोठी आहे. केंद्र सरकारकडे आम्ही वारंवार मागणी केली आहे की, सीमेवर धरण बांधावे किंवा पाकिस्तानच्या दूषित पाण्याला रोखण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. दुर्दैवाने केंद्राकडून पंजाबला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. मात्र, आता पंजाब सरकार स्वतःच्या स्तरावर यावर तोडगा काढण्यासाठी कामाला सुरुवात करणार आहे, जेणेकरून सीमावर्ती गावांतील नागरिकांना या विषारी पाण्यापासून मुक्ती मिळेल."
Web Summary : Pakistani factory waste poisons Punjab's rivers, causing severe health issues. Residents lack clean water, forcing reliance on expensive alternatives. The government promises action but faces challenges.
Web Summary : पाकिस्तानी कारखानों का कचरा पंजाब की नदियों को दूषित कर रहा है, जिससे स्वास्थ्य संबंधी गंभीर समस्याएं हो रही हैं। निवासियों के पास साफ पानी की कमी है, जिससे वे महंगे विकल्पों पर निर्भर हैं। सरकार ने कार्रवाई का वादा किया है, लेकिन चुनौतियां हैं।