'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 21:09 IST2026-01-18T21:07:41+5:302026-01-18T21:09:07+5:30
Kapil Sibal on BMC Election : 'भाजप लहान पक्षांशी सत्तेसाठी हातमिळवणी करते आणि सत्ता मिळताच त्यांनाच कडेला फेकते.'

'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य
Kapil Sibal on BMC Election : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी भारतीय जनता पक्षासह तिच्या मित्रपक्षांवर जोरदार टीका केली आहे. 'भाजप लहान पक्षांशी सत्तेसाठी हातमिळवणी करते आणि सत्ता मिळताच त्यांनाच कडेला फेकते,' असा गंभीर आरोप सिब्बल यांनी केला.
बीएमसी निकाल काय सांगतात?
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठे यश मिळवत 89 जागांवर विजय मिळवला. तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ने 29 आणि
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने केवळ 3 जागा मिळवल्या. या पार्श्वभूमीवर सिब्बल म्हणाले, 'या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांचे नुकसान झाले, फायदा झाला तो फक्त भाजपलाच. संधीसाधू राजकारण जनता ओळखते. यापासून विरोधकांनी धडा घ्यायला हवा.'
#WATCH | Delhi | Rajya Sabha MP Kapil Sibal says, "BJP allies with smaller parties in the states they know they will not win, and then marginalise the same parties after coming to power... They never compromise with anyone where their direct tussle is with Congress, such as in… pic.twitter.com/SaMMIxhkQy
— ANI (@ANI) January 18, 2026
भाजपची रणनीती : आधी साथ, नंतर वनवास
सिबल पुढे म्हणतात, 'ज्या राज्यांत भाजपला एकहाती विजयाची खात्री नसते, तिथे ते लहान पक्षांशी तडजोड करतात. मात्र सत्ता मिळाल्यानंतर त्याच पक्षांना हळूहळू बाजुला ढकलले जाते. जिथे काँग्रेसशी थेट लढत आहे, जसे उत्तर प्रदेश, तिथे भाजप कुणाशीही तडजोड करत नाही. आता हीच खेळी तामिळनाडूतही खेळली जात आहे. केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही भाजप अडचणीत आहे.'
...तर तुमचे भविष्य संपते
कपिल सिब्बल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना म्हटले की, 'निकालानंतर शिंदेंना आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवावे लागत आहे. याचे कारण म्हणजे, भाजप फोडाफोडी करते, हे त्यांनाही माहीत आहे. अजित पवार कोणत्याही एका बाजूला ठाम राहिले नाहीत. त्यामुळे ते फक्त तीन जागांवर अडकले. या निवडणुकीत त्यांचेच नुकसान झाले. त्यांनी स्वतःचे राजकीय भविष्य धोक्यात घातले. भाजपसोबत तडजोड केली तर तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते, सत्ता मिळू शकते, पण तुमचे भविष्य संपते,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.