India Iran: भारतासाठी आनंदाची बातमी! इराणने मैत्री निभावली; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना 'सेफ पॅसेज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:03 IST2026-03-12T11:03:23+5:302026-03-12T11:03:48+5:30
India Energy Crisis: भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' बंद केला होता. आता भारतीय जहाजांना सोडण्यात येणार आहे.

India Iran: भारतासाठी आनंदाची बातमी! इराणने मैत्री निभावली; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना 'सेफ पॅसेज'
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्यातील दूरध्वनी संभाषणानंतर, इराणनेभारतीय टँकरना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मंजूर केला आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, कारण होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे. तो जागतिक तेल आणि नैसर्गिक वायूचा महत्त्वपूर्ण भाग वाहून नेतो.
इराण आणि अमेरिकामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे जगभरात गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. मागील दोन दिवसांपासून भारतात गॅसचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस बंद केला आहे. यामुळे अनेक हॉटेल बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता इराणने भारतीय जहाजे सोडण्यास परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.
परराष्ट्रमंत्र्यांनी इराणच्या अराघची यांच्याशी चर्चा केल्यानंतर इराणने भारतीय तेल टँकरना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमधील चर्चेचा उद्देश हा महत्त्वाचा सागरी मार्ग खुला ठेवणे होता जेणेकरून कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत होऊ नये.
रशिया आणि फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही चर्चा
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केवळ इराणशीच नव्हे तर इतर प्रमुख जागतिक शक्तींशीही समन्वय साधला. त्यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि फ्रेंच परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरो यांच्याशीही या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली. या चर्चेचा उद्देश सागरी व्यापार मार्ग खुले ठेवणे आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे रोखणे हा होता.
अमेरिका, युरोप आणि इस्रायलवरील निर्बंध राहणार
अमेरिका, युरोप आणि इस्रायलशी जोडलेल्या जहाजांना या मार्गावर कडक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. पण, आता इराणने भारताला ही विशेष सवलत दिली आहे.
अमेरिका, युरोप आणि इस्रायलशी जोडलेल्या जहाजांवरील निर्बंध कायम राहतील, परंतु भारतीय टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करू शकतील, असे इराणने स्पष्ट केले आहे. हे भारतासाठी एक राजनैतिक यश आहे, कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीतील शिपिंग ट्रॅफिक सध्या ९०% ने कमी झाले आहे आणि अनेक देशांचे टँकर अडकले आहेत.