"काँग्रेसने मला मंत्री बनवले नाही, हे एका अर्थाने चांगलेच झाले"; रामदास आठवलेंची राज्यसभेत फटकेबाजी, UPA ला लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:38 IST2026-02-05T17:37:25+5:302026-02-05T17:38:04+5:30
Ramdas Athawale Rajya Sabha Speech: राज्यसभेत रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि UPA वर निशाणा साधला. "तिकडे ५ वर्षे राहिलो असतो, इथे १३ वर्षे मंत्री आहे" असे म्हणत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली.

"काँग्रेसने मला मंत्री बनवले नाही, हे एका अर्थाने चांगलेच झाले"; रामदास आठवलेंची राज्यसभेत फटकेबाजी, UPA ला लगावला टोला
नवी दिल्ली: संसदेत सध्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील 'धन्यवाद प्रस्तावा'वर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत सभागृहात हास्यलहरी निर्माण केल्या. "काँग्रेसने मला मंत्री बनवले नाही, हे एका अर्थाने चांगलेच झाले," असे विधान करत त्यांनी यूपीए सरकारच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.
आठवले यांनी सांगितले की, ते पूर्वी काँग्रेससोबत होते आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांसाठी वारंवार तत्कालीन मंत्र्यांना भेटायचे. "काँग्रेसने काहीच केले नाही असे नाही, पण जेवढे करायला हवे होते तेवढे केले नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुढे मिश्किलपणे ते म्हणाले, "मी तेव्हा यूपीएसोबत होतो. जर त्यांनी मला तेव्हाच मंत्री बनवले असते, तर मी आज इकडे (NDA कडे) आलो नसतो. त्यांनी मला मंत्री बनवले नाही, हे माझ्यासाठी चांगलेच ठरले. तिथे राहिलो असतो तर ५ वर्षे मंत्री राहिलो असतो, पण इकडे मी गेल्या १३ वर्षांपासून मंत्री आहे."
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात 'तू-तू मैं-मैं' पाहायला मिळाली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेतील मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. यावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि खर्गे यांच्यात "कोणी कोणाला बंधक बनवले आहे?" यावरून जोरदार शाब्दिक युद्ध रंगले.
नड्डांचा 'अबोध बालक' टोला
राज्यसभेत बोलताना जे. पी. नड्डा यांनी कोणाचेही नाव न घेता राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, "तुमच्या पक्षाला एका 'अबोध बालका'चा (अजाण बालक) बंधक बनवू नका. लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने काम व्हायला हवे. तुम्ही तुमचा पक्ष स्वतंत्रपणे चालवा, पण एका व्यक्तीच्या हट्टापायी संपूर्ण पक्षाला वेठीस धरू नका."
खर्गेंचे "मोदींचे बंधक" प्रत्युत्तर
नड्डांच्या या टीकेला मल्लिकार्जुन खर्गे यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. "आम्हाला सल्ला देण्यापेक्षा स्वतःकडे पहा. पंतप्रधान मोदींनी तुम्हाला 'बंधक' बनवले आहे. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही साधे अक्षरही बोलू शकत नाही," असा टोला खर्गे यांनी लगावला.