"मी भिकारी नाही, माझे फोटो चुकीच्या पद्धतीने..."; 'करोडपती भिकारी' प्रकरणात नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 10:11 IST2026-01-20T10:08:14+5:302026-01-20T10:11:30+5:30
इंदूरमधील ‘करोडपती भिकारी’ मांगीलालच्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे.

"मी भिकारी नाही, माझे फोटो चुकीच्या पद्धतीने..."; 'करोडपती भिकारी' प्रकरणात नवा ट्विस्ट
इंदूरमधील ‘करोडपती भिकारी’ मांगीलालच्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. प्रशासनाने भिकारी समजून रेस्क्यू केलेल्या आणि कुष्ठरोगाने ग्रस्त असलेल्या मांगीलालच्या प्रकरणात आता त्याचे नातेवाईक समोर आले आहेत. त्यांनी सरकारी दावा चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. मांगीलालच्या पुतण्याने असा दावा केला आहे की, जेव्हा त्याने आश्रयगृहात जाऊन त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी सांगितलं की ते भिकारी नाहीत. ते सराफा बाजारात पैसे वसुलीसाठी जात असत आणि काही गैरसमजामुळे त्यांचे फोटो भिकारी म्हणून व्हायरल आले.
मांगीलालच्या पुतण्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की, प्रशासन ज्या मालमत्तेला त्याच्या काकांची मालमत्ता सांगत आहे, ती माहिती चुकीची असून त्याबाबत गैरसमज पसरवला गेला आहे. प्रशासनाच्या वतीने असा दावा करण्यात आला होता की, मांगीलालकडे तीन पक्की घरं आहेत, ज्यात एका तीन मजली इमारतीचाही समावेश आहे. याशिवाय त्याच्या नावावर तीन रिक्षा असून त्या भाड्याने चालवल्या जातात. इतकंच नाही तर त्याच्याकडे स्वतःची कार असून त्यासाठी त्याने ड्रायव्हरही ठेवला आहे. या दाव्यांनंतर हे प्रकरण वेगाने चर्चेत आले आणि सोशल मीडियावर मांगीलालला 'करोडपती' भिकारी म्हटलं जाऊ लागले.
मांगीलालच्या पुतण्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितलं की, "माझ्या काकांच्या मालमत्तेबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. ज्या तीन मजली घराचा उल्लेख केला जात आहे, ते घर माझ्या आईच्या नावावर आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये सर्व काही स्पष्ट आहे. त्या घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते मी स्वतः भरतो. आमच्याकडे यासंदर्भातील सर्व कागदपत्रं उपलब्ध आहेत." तसेच "मी भिकारी नाही, माझे फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल झाले" असं मांगीलालने म्हटलं आहे.
पुतण्याच्या म्हणण्यानुसार, मांगीलाल सराफा बाजारात भीक मागण्यासाठी जात नव्हते. तो म्हणतो की, माझे काका सराफा बाजारातील लहान काम करणाऱ्या लोकांना पैसे व्याजाने देत असत. जेव्हा मी त्यांना आश्रयगृहात भेटलो, तेव्हा त्यांनी सांगितलं की ते तिथे पैसे वसूल करण्यासाठी गेले होते. शारीरिक व्याधीमुळे ते चालू-फिरू शकत नाहीत, म्हणून ते चाके असलेल्या फळीवर बसून जातात. याच कारणामुळे लोकांना वाटलं की ते भीक मागत आहेत आणि त्यांचे फोटो व्हायरल झाले. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.