बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 05:55 IST2026-05-12T05:54:34+5:302026-05-12T05:55:17+5:30
आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान अधिक मजबूत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा अधोरेखित केली.

बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
नवी दिल्ली : आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान अधिक मजबूत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा अधोरेखित केली. आपण परदेशातून येणाऱ्या वस्तूंचा वापर कमी केला पाहिजे. इंधनाचा वापर कमी करण्याचे, सार्वजनिक वाहतूक किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे तसेच सोन्याची खरेदी काही काळ पुढे ढकलण्याचे आवाहनही त्यांनी पुन्हा केले. त्यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे पडसाद आज देशभरात उमटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केलेले हे आवाहन केवळ आर्थिक अडचण नसून, भारतासाठी स्वावलंबन आणि आर्थिक स्थिरता मजबूत करण्याची एक मोठी संधी आहे. यामुळे स्वदेशी गुंतवणुकीला चालना, परकीय चलन साठ्याचे रक्षण होईल. भारताला कच्चे तेल आणि सोन्यासाठी डॉलरमध्ये पेमेंट करावे लागते. जर नागरिकांनी एक वर्ष सोने खरेदी टाळली, तर भारताचे लाखो कोटी रुपये वाचू शकतात.
देशाचा पैसा देशातच राहील
इंधनाचा वापर कमी केल्याने इंधनावरील आयात बिल कमी होईल. यामुळे आपल्याला इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जेकडे वळवण्याची मोठी संधी आहे. तेल आणि सोन्याची आयात कमी झाल्यामुळे चालू खात्यातील तूट लक्षणीयरीत्या कमी होईल. यामुळे भारताचे जागतिक क्रेडिट रेटिंग सुधारेल आणि परदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करण्यास अधिक उत्सुक होतील.
सोन्याऐवजी शेअर बाजार, म्युच्युअल फंड किंवा सरकारी बाँड्समध्ये पैसे गुंतवले तर देशांतर्गत भांडवल वाढेल. परदेश दौरे टाळल्यामुळे नागरिक देशातील पर्यटन स्थळांना भेट देतील. यामुळे भारताच्या पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला मोठी चालना मिळेल. देशातंर्गत रोजगार वाढेल. भारताचा परकीय चलन साठा मजबूत होईल आणि रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत स्थिर राहण्यास मदत होईल. भारताचा आर्थिकदृष्ट्या फायदा होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनतेला काय आवाहन?
शक्य तिथे पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून मेट्रो, इलेक्ट्रिक बस, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्या.
परदेशातील भारतीयांनी किमान पाच विदेशी पाहुण्यांना भारतभेटीला आणावे.
परिस्थिती सामान्य होईपर्यंत सोन्याची खरेदी टाळून परकीय चलन बचत करा.
खाद्यतेलाचा वापर मर्यादित करा. परदेशी वस्तूंऐवजी स्थानिक उत्पादनांचा स्वीकार करा.
जिथे शक्य आहे तिथे कर्मचाऱ्यांनी घरून काम करावे. शाळांनी ऑनलाइन क्लासेस चालू करावेत.
प्रत्येकाने संसाधनांचा संयम व जबाबदारीने वापर करावा. व्होकल फॉर लोकलला प्रोत्साहन द्या.