युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 07:10 IST2026-05-12T07:09:00+5:302026-05-12T07:10:07+5:30
ट्रम्प यांनी या प्रस्तावाचा सविस्तर तपशील जाहीर केला नसला तरी, एका प्रमुख रिपब्लिकन नेत्याने त्यांना आता लष्करी पर्यायाचा विचार करण्याचा आग्रह केला आहे.

युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
वॉशिंग्टन : अनेक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी इराणने दिलेला प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे अमान्य असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे. त्यामुळे युद्ध पुन्हा पेटू शकते. या घडामोडीमुळे जगाची चिंता वाढली आहे.
ट्रम्प यांनी या प्रस्तावाचा सविस्तर तपशील जाहीर केला नसला तरी, एका प्रमुख रिपब्लिकन नेत्याने त्यांना आता लष्करी पर्यायाचा विचार करण्याचा आग्रह केला आहे.
२८ फेब्रुवारी रोजी इराणसोबत सुरू झालेल्या युद्धामुळे जागतिक तेल पुरवठ्याचा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद झाला असून अनेक देशांत इंधन टंचाई निर्माण झाली आहे.
मी इराणच्या तथाकथित 'प्रतिनिधींनी' दिलेला प्रतिसाद नुकताच वाचला आहे. तो मला अजिबात आवडलेला नाही. तो पूर्णपणे अमान्य आहे!, असे ट्रम्प यांनी रविवारी त्यांच्या 'टुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर लिहिले.
इस्रायलशी डोनाल्ड ट्रम्प यांची चर्चा
ट्रम्प यांनी 'अॅक्सिओस'ला सांगितले की, त्यांनी रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी संवाद साधला आणि इराणच्या प्रतिसादासह इतर विषयांवर चर्चा केली. ती एक अतिशय चांगली चर्चा होती. आमचे संबंध चांगले आहेत, असे त्यांनी नेतान्याहूंबद्दल मत व्यक्त केले.