तिरुवनंतपुरम : दहा वर्षांनंतर डाव्या आघाडीचे पानिपत करून सत्तेत आलेल्या काँग्रेस नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने केरळमध्ये वडास्सेरी दामोदर मेनन सतिशन यांचा शपथविधी होताच महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सतिशन यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर नव्या सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महिलांसाठी मोफत बसप्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यासारखे महत्त्वाचे निर्णय जाहीर करत आपली कल्याणकारी भूमिका स्पष्ट केली. १५ जूनपासून महिलांना केएसआरटीसी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. असा विभाग स्थापन करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचा दावा मुख्यमंत्री सतिशन यांनी केला.
शपथविधीत शक्तिप्रदर्शन
तिरुवनंतपुरमच्या सेंट्रल स्टेडियममध्ये राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सतिशन आणि त्यांच्या २० सदस्यीय मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्याला अनेक वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.
आशा सेविका ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत दिलासा
नव्या सरकारने आशा सेविकांच्या मानधनात दरमहा ३ हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांचे मासिक मानधन १२ हजार रुपयांवर असेल. याशिवाय अंगणवाडी सेविका व मदतनीस, शालेय स्वयंपाक कर्मचारी तसेच पूर्वप्राथमिक शिक्षक आणि आया यांच्या मानधनातही वाढ जाहीर केली.
चेन्निथला यांच्याकडे गृहखाते?
यूडीएफ मंत्रिमंडळातील सर्वाधिक अनुभवी आणि प्रभावी चेहऱ्यांपैकी रमेश चेन्निथला यांचे नाव अग्रस्थानी आहे. ६९ वर्षीय चेन्निथला तिसऱ्यांदा मंत्री बनले असून, १९८६ मध्ये वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी मंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. गृह आणि दक्षता खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : After a decade, the UDF, led by Congress, has come to power in Kerala. The new government announced free bus travel for women on KSRTC buses starting June 15th, and a separate department for senior citizens. Increased salaries for Anganwadi workers and ASHA workers were also announced.
Web Summary : एक दशक बाद, कांग्रेस के नेतृत्व वाली यूडीएफ केरल में सत्ता में आई। नई सरकार ने 15 जून से केएसआरटीसी बसों में महिलाओं के लिए मुफ्त बस यात्रा और वरिष्ठ नागरिकों के लिए एक अलग विभाग की घोषणा की। आंगनवाड़ी कार्यकर्ताओं और आशा कार्यकर्ताओं के वेतन में भी वृद्धि की घोषणा की गई।