दिल्ली-ग्रेटर नोएडात ६५ किमी वेगाने आलेल्या वादळाने दाणादाण; २५ ट्रान्सफॉर्मर खाक, १६ गावं अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 09:33 IST2026-03-19T09:32:37+5:302026-03-19T09:33:28+5:30

अचानक आलेल्या वेगवान वादळाने आणि मुसळधार पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असून, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.

Delhi-Greater Noida hit by 65 kmph storm; 25 transformers burnt, 16 villages in darkness | दिल्ली-ग्रेटर नोएडात ६५ किमी वेगाने आलेल्या वादळाने दाणादाण; २५ ट्रान्सफॉर्मर खाक, १६ गावं अंधारात

दिल्ली-ग्रेटर नोएडात ६५ किमी वेगाने आलेल्या वादळाने दाणादाण; २५ ट्रान्सफॉर्मर खाक, १६ गावं अंधारात

दिल्ली-एनसीआरसह गौतम बुद्ध नगर जिल्ह्याला बुधवारी संध्याकाळी निसर्गाच्या भीषण कोपाचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या वेगवान वादळाने आणि मुसळधार पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असून, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागाला या वादळाचा मोठा फटका बसला असून, तब्बल १६ गावांमध्ये रात्रभर काळोखाचे साम्राज्य पसरले होते.

विजेचे खांब उन्मळून पडले, ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा बिघाड

वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरात १५० पेक्षा जास्त विजेचे खांब पत्त्यासारखे कोसळले. यामुळे वीज वितरण यंत्रणेचे कंबरडे मोडले आहे. सुमारे २५ ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले आहेत. दादरी, दनकौर, रबूपुरा आणि जेवर यांसारख्या ग्रामीण भागांत वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असून, वीज कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत.

बळीराजावर अस्मानी संकट

एकीकडे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र पाणी आले आहे. शेतात गव्हाचे पीक कापणीला आले असतानाच ६५ किमी प्रतितास वेगाने आलेल्या वाऱ्याने उभं पीक जमिनीला टेकलं आहे. यामुळे गव्हाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत असून, दाण्यांची गुणवत्ता खराब झाल्याने बाजारात योग्य भाव मिळणार नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत.

प्रशासनाकडून 'यलो अलर्ट' जारी

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, वादळाचा हा तडाखा अजून काही दिवस कायम राहू शकतो. १९ ते २१ मार्च दरम्यान पुन्हा वेगवान वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. "विजेचे खांब आणि झाडांपासून दूर राहा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रदूषण घटले, पण वाहतुकीचा खोळंबा

या पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली असली तरी, रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. ग्रेटर नोएडा वेस्ट आणि दादरी परिसरात अनेक तास वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सध्या महापालिका आणि वीज विभागाचे पथक रस्ते मोकळे करण्याचे आणि वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

Web Title : दिल्ली-ग्रेटर नोएडा में तूफान का कहर: बिजली गुल, फसलें बर्बाद

Web Summary : दिल्ली-एनसीआर में आए भीषण तूफान से बिजली के खंभे गिरे, ट्रांसफॉर्मर क्षतिग्रस्त हुए, जिससे गाँव अंधेरे में डूब गए। किसानों को गेहूं की फसल का नुकसान हुआ। मौसम विभाग ने येलो अलर्ट जारी किया।

Web Title : Storm Devastates Delhi-Greater Noida: Power Outages, Crop Damage Reported

Web Summary : A powerful storm hit Delhi-NCR, felling power poles and damaging transformers, leaving villages without electricity. Farmers face crop losses as wheat fields were flattened. Yellow alert issued for continued weather disturbances.