"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:52 IST2025-10-07T14:51:20+5:302025-10-07T14:52:27+5:30
CJI BR Gawai Attacked, Adv. Rakesh Kishor: परमात्म्याने माझ्या हातून ते करवून घेतलं..- वकिल राकेश किशोर

"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
CJI BR Gawai Attacked, Adv. Rakesh Kishor: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांच्यावर हल्ला करणारे वकील राकेश किशोर यांना समज देऊन सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी केलेली कृती आणि त्यानंतर घडलेल्या घटना याबद्दल अनेक तपशील शेअर केले. वकील डॉ. राकेश किशोर म्हणाले की, परमात्म्याने मला जे करण्यास सांगितले तेच मी केले. खजुराहोमधील भगवान विष्णूच्या मूर्तीबाबतच्या याचिकेबाबत १६ सप्टेंबर रोजी सरन्यायाधीश गवई यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे मी दुखावले होते. त्यामुळे परत्म्याने माझ्याकडून तसे घडवून घेतले, असे राकेश किशोर टीव्हीनाइनशी बोलताना म्हणाले.
हा त्यांचा चांगुलपणा की त्यामागे काही रहस्य...
बीआर गवई यांच्यावर हल्ला केल्यानंतर राकेश कुमार यांना काही तासांसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मी जेव्हा कृती केली, तेव्हा असा विचार करून गेलो होतो की माझ्यासोबत जे घडायचे आहे ते घडू दे, देवाची इच्छा असेल ते माझ्यासोबत होईल, मी काहीही करू शकत नाही. पण मला सोडून देण्यात आले. मलाही समजत नाहीये की हा सरन्यायाधीशांचा दयाळूपणा आहे, त्यांचा चांगुलपणा आहे की यामागे काही वेगळंच रहस्य आहे.
बार कौन्सिलने रद्दल केले सदस्यत्व
बी.आर. गवई यांनी वकिलाविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केली नाही. उलट, त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देऊन त्यांना जाऊ देण्यास सांगितले. त्यानंतर बार कौन्सिलने कारवाई केली आणि त्यांचे सदस्यत्व रद्द केले. बार कौन्सिल ऑफ इंडियाने केलेल्या कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले की, मला काल संध्याकाळी पत्र मिळाले. हा हुकूमशाही, तुघलकी निर्णय आहे. १९६१ च्या वकिलांच्या कायद्याचे कलम ३५ मध्ये स्पष्टपणे सांगते की जर कोणत्याही वकिलाकडून कोणतीही बाब तुमच्याकडे आली किंवा तुम्ही स्वतःहून दखल घेतली तर तुम्ही एक शिस्तपालन समिती स्थापन करावी आणि कारणे दाखवा नोटीस बजावावी. त्याला त्याच्या कृतींचे स्पष्टीकरण देण्याची संधी दिली पाहिजे. त्यांनी हे सर्व न करता निलंबनाची कारवाई केली आणि तुघलकी हुकूम जारी केला.
अनेक वकील माझ्या पाठिशी- राकेश किशोर
जेव्हा राकेश यांना विचारण्यात आले की या कृत्यानंतर वकील त्याच्या विरोधात गेले आहेत का, तेव्हा ते म्हणाले की सर्व वकील माझ्या विरोधात नाहीत. मला अनेक वकिलांचे फोन आणि मेसेज येत आहेत. मला इतर पक्षांचेही फोन येत आहेत. मी कुणाच्याही धर्माबद्दल काय बोललो नाही, कोणते अपमानजनक शब्द वापरले नाहीत. मी इथेच बसलो आहे.ृ