VIDEO: थेट मृत्यूलाच आमंत्रण! मित्राने रोखलं म्हणून पेट्रोलच्या नोजलला लावली आग, संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:58 IST2026-02-20T15:49:32+5:302026-02-20T15:58:08+5:30
पेट्रोल पंपाजवळ सिगारेट पिणाऱ्या तरुणाने थेट पेट्रोलजवळ लाईटर पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे.

VIDEO: थेट मृत्यूलाच आमंत्रण! मित्राने रोखलं म्हणून पेट्रोलच्या नोजलला लावली आग, संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Petrol Pump Fire: पेट्रोल पंपावर सिगरेट ओढणे किती धोकादायक ठरू शकते, याची कल्पना असतानाही एका तरुणाने केवळ रागाच्या भरात पेट्रोल नोजललाच आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली. छत्तीसगडच्या रायपूरमधील उरला परिसरात हा प्रकार घडला असून, सुदैवाने पंप कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास इम्रान आणि त्याचा मित्र धर्मेंद्र क्षत्री हे संगीता फ्यूल्स या पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. यावेळी मागे बसलेल्या धर्मेंद्रने सिगरेट पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याचा मित्र इम्रान आणि पंप कर्मचाऱ्यांनी त्याला पेट्रोल पंप परिसरात सिगरेट पिण्यास सक्त मनाई केली. या साध्याशा सुचनेचा धर्मेंद्रला इतका राग आला की, त्याने रागाच्या भरात स्वतःकडील लायटरने थेट पेट्रोल भरणाऱ्या नोजललाच आग लावली. नोजलमधून पेट्रोल पडत असल्याने क्षणात आगीचा भडका उडाला आणि बघता बघता ही आग बाईकच्या टाकीपर्यंत पोहोचली.
कर्मचाऱ्याची सुपरफास्ट कामगिरी
आग लागताच परिसरात एकच खळबळ उडाली. नोजलमधून जळते पेट्रोल बाहेर पडू लागल्याने मोठी स्फोट होण्याची भीती होती. मात्र, पंपावरील कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता मुख्य पुरवठा बंद केला आणि तातडीने तिथे असलेल्या अग्निशमन उपकरणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रक्रियेत जळते पेट्रोल आरोपी धर्मेंद्रच्या अंगावरही उडाले, ज्यामुळे तो घाबरून पळू लागला.
CCTV मध्ये कैद झाला थरार
ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कशाप्रकारे आरोपीने नोजलला लायटर लावला आणि संपूर्ण पंप परिसरात आगीच्या ज्वाळा उठल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्स आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.
दोन्ही आरोपींना बेड्या
घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या धर्मेंद्र आणि इम्रानला पंप कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पेट्रोल पंप व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून उरला पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
सतर्कतेमुळे टळली मोठी जीवितहानी
पेट्रोल पंपाखाली हजारो लिटर पेट्रोल साठवलेले असते. जर ही आग वेळीच विझवली गेली नसती, तर संपूर्ण परिसर उध्वस्त झाला असता. पंप कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या हिमतीमुळे आज शेकडो लोकांचे प्राण वाचले आहेत.