सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 10:11 IST2026-05-18T10:11:32+5:302026-05-18T10:11:56+5:30
बिहारच्या सासाराम रेल्वे स्टेशनवर एका पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागली. आगीत एक बोगी पूर्णपणे जळून खाक झाली असून प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती.

सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
बिहारमधील सासाराम रेल्वे स्टेशनवर सोमवारच्या पहाटे प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर उभी असलेल्या सासाराम-पटना फास्ट पॅसेंजर (ट्रेन क्रमांक ५३२१२)च्या एका बोगीला अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीच्या ज्वाला एवढ्या वेगाने पसरल्या की, ट्रेनची पाचवी बोगी पूर्णपणे जळून खाक झाली, तर चौथ्या बोगीचा मागचा भागही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या अचानक लागलेल्या आगीमुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांमध्ये गदारोळ माजला आणि प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
ही घटना सोमवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली. सुदैवाने रेल्वे कर्मचारी आणि अग्निशामक दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
शौचालयातून निघू लागला धूर; मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी वाचवले प्राण
ही ट्रेन दररोज सकाळी ६:४५ वाजता पटनासाठी रवाना होते. सोमवार सकाळी नेहमीप्रमाणे ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी होती आणि प्रवासी हळूहळू ट्रेनमध्ये बसत होते. त्याच वेळी अचानक बी-३ बोगीच्या शौचालयातून अतिशय दाट धूर निघू लागला. रेल्वे स्टेशनच्या बाजूला मॉर्निंग वॉक करत असलेल्या स्थानिक लोकांच्या नजरेत हा धूर पडताच त्यांनी तातडीने आरडाओरडा करत आरपीएफ आणि रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली.
मोठा अनर्थ टळला, सर्व प्रवासी सुरक्षित
ट्रेन सुटण्यास आणखी एक तासाचा अवधी असल्यामुळे सुदैवाने त्या वेळी बोगीमध्ये फारशी गर्दी नव्हती. आगीची बातमी समजताच रेल्वे कर्मचारी आणि सुरक्षा दलांनी तातडीने पावले उचलत प्रवाशांना डब्यातून बाहेर काढले आणि पूर्ण प्लॅटफॉर्म रिकामा केला. रेल्वे कर्मचारी, स्थानिक मजूर आणि माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे मोठा रेल्वे अपघात टळला असून एकही प्रवासी जखमी झालेला नाही.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
या घटनेची माहिती मिळताच डीडीयू रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. प्राथमिक तपासानुसार, ही आग शॉर्ट सर्किट किंवा इतर कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रेल्वे प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. आग लागलेली बोगी ट्रेनपासून वेगळी करण्यात आली आहे.
या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या मते, जर ट्रेनमध्ये वेळेवर पाणी आणि अग्निशामक यंत्रांचा वापर केला गेला असता, तर आगीचे स्वरूप एवढे भीषण झाले नसते आणि नुकसान टाळता आले असते. सुरुवातीच्या काळात आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळेच बघता बघता संपूर्ण बोगी जळून खाक झाली, असा आरोप प्रवाशांनी केला आहे.