दक्षिण कोरियन महिलेची एअर इंडियाच्या पुरुष कर्मचाऱ्याकडून तपासणी; नको तिथे हात लावत मिठीतही घेतले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 11:27 IST2026-01-22T11:27:06+5:302026-01-22T11:27:25+5:30
Bengaluru Airport Molestation Case: बेंगळुरू विमानतळावर एका सुरक्षा कर्मचाऱ्याने दक्षिण कोरियन महिलेशी गैरवर्तन केले. तपासणीच्या बहाण्याने विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दक्षिण कोरियन महिलेची एअर इंडियाच्या पुरुष कर्मचाऱ्याकडून तपासणी; नको तिथे हात लावत मिठीतही घेतले...
बेंगळुरू: देशातील महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक असलेल्या बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणीच्या नावाखाली एका परदेशी महिलेचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दक्षिण कोरियातील एका महिला प्रवाशाने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यावर अश्लील चाळे आणि स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.
संबंधित दक्षिण कोरियन महिला प्रवासात असताना सुरक्षा तपासणीच्या रांगेत उभी होती. यावेळी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने अधिकार नसतानाही तिला तपासणीच्या बहाण्याने बाजूला नेले. पीडित महिलेचा आरोप आहे की, या कर्मचाऱ्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केला आणि अश्लील कृत्य केले.
पोलिसांची कारवाई आणि सीसीटीव्ही फुटेज
महिलेने विमानतळ प्राधिकरणाकडे तक्रार केल्यानंतर, विमानतळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. प्राथमिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला ओळखण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. बेंगळुरू पोलिसांनी त्याच्यावर विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न
भारतात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी नागरिकांसोबत, विशेषतः महिलांसोबत होणाऱ्या अशा गैरवर्तनामुळे देशाच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विमानतळ प्राधिकरणाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित कर्मचाऱ्याची हकालपट्टी करण्याचे संकेत दिले आहेत.