मृत महिलेच्या भावाला बँक म्हणाली, खातेदाराला आणा; मृत्यूचा दाखला म्हणून सांगाडाच आणला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 06:55 IST2026-04-29T06:54:45+5:302026-04-29T06:55:06+5:30
बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन जीतू ३ किमी चालत बँकेत पोहोचला. बँकेत पोहोचल्यावर त्याने सांगाड्यावर झाकलेला कपडा हटवला आणि प्रचंड गोंधळ उडाला

मृत महिलेच्या भावाला बँक म्हणाली, खातेदाराला आणा; मृत्यूचा दाखला म्हणून सांगाडाच आणला!
केओंझार (ओडिशा) : बहीण गेली, तिच्या बँक खात्यातील पैसे काढायचे म्हणून भावाने बँकेत खेटे घातले. पण, पुरावा म्हणून ‘हे आणा ते आणा’ किंवा खातेदारालाच घेऊन या, असे अधिकारी सांगत राहिले. शेवटी भावाने चक्क बहिणीचा सांगाडाच बँकेत आणला.
केओंझार जिल्ह्यात जीतू मुंडा या आदिवासीच्या मृत बहिणीच्या खात्यात २० हजार रुपये होते. तिच्या पतीचा व मुलाचाही मृत्यू झाल्याने जीतू हाच वारस होता. पण बँक पुरावे मागत होती.
खांद्यावर सांगाडा अन् ३ किमी पायी प्रवास
बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन जीतू ३ किमी चालत बँकेत पोहोचला. बँकेत पोहोचल्यावर त्याने सांगाड्यावर झाकलेला कपडा हटवला आणि प्रचंड गोंधळ उडाला. बँक कर्मचाऱ्यांनी जीतूला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. शेवटी पोलिसांना बोलवावे लागले.
पोलिसांनी जीतूला बहिणीच्या नावे असलेले पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही यात लक्ष घालून जीतूला पैशाची हमी दिली नंतर बँकेत आणलेला सांगाडा पुन्हा स्मशानभूमीत नेऊन दफन करण्यात आला.
तत्काळ निपटारा करू : बँकेचे स्पष्टीकरण
इंडियन ओव्हरसीज बँकेने मंगळवारी जीतू यांच्या बहिणीचे मृत्यू प्रमाणपत्र बँकेत दाखल होताच त्यांच्या दाव्याचा प्राधान्यक्रमाने निपटारा केला जाईल, असे स्पष्टीकरण दिले.