जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 08:55 IST2026-04-29T08:55:01+5:302026-04-29T08:55:34+5:30
या केंद्रात स्वयंसेवकांना एका पूर्णपणे बंद (सीलबंद) निवासात राहावं लागेल. बाहेरील जगाशी त्यांचा कोणताही संपर्क नसेल किंवा अपवादात्मक परिस्थितीत अत्यंत मर्यादित स्वरुपात हा संपर्क त्यांना दिला जाईल

जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
अतिशय गंभीर गुन्ह्यासाठी अटक केलेल्या गुन्हेगारांना तुरुंगात एकांतवासात ठेवलं जातं. एकांतवासाची शिक्षा तुरुंग व्यवस्थेत वापरली जाणारी एक कठोर शिक्षा मानली जाते. कैद्याला इतरांपासून पूर्णपणे वेगळं ठेवून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी ती दिली जाते. जर्मनीत मात्र सहा अंतराळ संशोधकांनाच तब्बल शंभर दिवसांसाठी एकांतवासात ठेवण्यात आलं आहे. - का? त्यांनी तसाच काही मोठा गुन्हा केला आहे का? - तर नाही. असलं काहीही घडलेलं नाही. तरीही त्यांना एकांतवासात ठेवण्यात आलं आहे, कारण जर्मनीनं एका अतिशय आव्हानात्मक आणि भविष्यवेधी प्रयोगाला सुरुवात केली आहे. या प्रयोगाचं नाव आहे ‘एसओलिस १००’! या प्रयोगामध्ये सहा स्वयंसेवकांना पूर्णपणे एकांतात ठेवण्यात आलं आहे. भविष्यात चंद्र आणि मंगळ मोहिमा आणखी वेग घेतील. या मोहिमांसाठी मानवाला तयार करण्यासाठी त्याचा अभ्यास म्हणून हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे.
युरोपियन अंतराळ संस्थेच्या नेतृत्वाखाली कोलोन येथील जर्मन एअरोस्पेस सेंटरमध्ये हा प्रयोग सुरू आहे. या प्रयोगासाठी स्वयंसेवकांना ‘एनविहॅब’ नावाच्या विशेष संशोधन केंद्रात ठेवण्यात आलं आहे. ‘एनविहॅब’ ही अशी सुविधा आहे, जिथे अंतराळातील परिस्थितीसारखं वातावरण कृत्रिमरीत्या तयार केलं जातं. मानवाला अंतराळात काय काय आणि कशा प्रकारच्या अडचणी येतात, त्यावर कशा पद्धतीनं मात करता येईल, याचाही अभ्यास या प्रयोगात केला जाणार आहे.
या केंद्रात स्वयंसेवकांना एका पूर्णपणे बंद (सीलबंद) निवासात राहावं लागेल. बाहेरील जगाशी त्यांचा कोणताही संपर्क नसेल किंवा अपवादात्मक परिस्थितीत अत्यंत मर्यादित स्वरुपात हा संपर्क त्यांना दिला जाईल. अंतराळातील दीर्घकालीन मोहिमांमध्ये एकटे राहणाऱ्या अंतराळवीरांना मानसिक आणि शारीरिक ताणापासून इतरही अनेक प्रकारच्या अडचणी येतात. त्याचा अभ्यास करून अंतराळवीरांना त्यासाठी सक्षम बनवण्याचा अभ्यास या प्रयोगात केला जाणार आहे.
पुढील तीन महिने हे स्वयंसेवक अत्यंत शिस्तबद्ध दिनक्रम पाळतील. हा दिनक्रम चंद्र आणि मंगळ मोहिमांमध्ये अपेक्षित कामकाजासारखाच असेल. त्यांच्या झोपेचं निरीक्षण, ताणाची पातळी, टीमवर्क आणि विचार करण्याची क्षमता (संज्ञानात्मक कार्यक्षमता) इत्यादी गोष्टींचाही या काळात अभ्यास केला जाईल.
दीर्घकाळ एकांतात राहिल्यानं माणसाच्या मनावर, विचारशक्तीवर आणि शरीरावर काय परिणाम होतो, हे या प्रयोगातून समजून घेतलं जाणार आहे. याशिवाय बंद वातावरणात राहिल्यानं शरीरातील सूक्ष्मजीव (मायक्रोबायोम) कसे बदलतात, याचाही अभ्यास केला जाणार आहे. यामुळे मर्यादित जागेत माणूस कसा जुळवून घेतो, याची अधिक माहिती मिळेल.
पूर्वी काही प्रयोगांमध्ये फक्त सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचे (मायक्रोग्रॅव्हिटी) परिणाम पाहिले गेले होते, जसे की ‘बेड रेस्ट’ संदर्भातील अभ्यास. मात्र ‘एसओलिस १००’ या प्रयोगात विशेषतः मानसिक आणि वर्तनात्मक बदलांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे, कारण अंतराळ मोहिमांमध्ये केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक ताणही खूप मोठ्या प्रमाणावर असतो. संशोधकांच्या मते, असा एकच प्रयोग अंतराळातील सर्व आव्हाने पूर्णपणे दाखवू शकत नाही. मात्र अशा विविध प्रयोगांमधून मिळालेली माहिती एकत्र करून अंतराळवीरांना अधिक चांगलं प्रशिक्षण देता येईल. या प्रयोगातून मिळणारे निष्कर्ष भविष्यातील मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. यातूनच योग्य अंतराळवीरांची निवड, त्यांचं प्रशिक्षण आणि अंतराळयानातील सहाय्यव्यवस्था यामध्ये सुधारणा करता येईल.