मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर

By दीपक भातुसे | Updated: April 29, 2026 09:24 IST2026-04-29T09:22:28+5:302026-04-29T09:24:43+5:30

पूर्व छाननी प्रक्रियेचे काम ६६ टक्के पूर्ण, बूथ आणि मतदार वाढल्याने शहरांची दमछाक

Gadchiroli leads in voter verification; Mumbai, Pune, Thane, Nagpur lag behind | मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर

मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर

दीपक भातुसे 

मुंबई - राज्यातील मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी हाती घेतलेल्या मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमातील (एसआयआर) पूर्व छाननी प्रक्रियेत (मॅपिंग) महाराष्ट्राने ६६.४२ टक्के प्रगती साधली आहे. मात्र, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे यासारख्या शहरी जिल्ह्यांमध्ये मॅपिंगचे ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. तर गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्याने मात्र ९०.५१ टक्के काम पूर्ण करून राज्यात आघाडी घेतली आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांनी ८० ते ९० टक्के मॅपिंग पूर्ण केले आहे, तर १३ जिल्ह्यांमध्ये ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर आणि लोकसंख्या वाढीमुळे मतदान केंद्रांची (बूथ) संख्या वाढल्याने शहरी भागात कामाचा वेग कमी झाला आहे.

कसे सुरू आहे मॅपिंग?
राज्यातील एकूण ९.८८ कोटी मतदारांपैकी सुमारे ६.५६ कोटी मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. एसआयआर पूर्व प्रक्रियेत ब्लॉक लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) सध्याच्या मतदार यादीची २००२ साली निवडणूक आयोगाने तयार केलेल्या यादीशी पडताळणी करीत आहेत. सध्याच्या मतदारांची नावे २००२ च्या यादीत असणे आवश्यक आहे. सध्या ही प्रक्रिया बीएलओ प्रत्यक्ष लोकांच्या घरी न जाता त्यांच्याकडील मतदार यादींच्या पडताळणीद्वारे करीत आहेत. ज्या नव्या मतदारांची नावे २००२ च्या यादीत नसतील, त्यांना त्यांच्या पालकांची नावे त्या यादीत असल्याचे पुरावे सादर करावे लागतील; पण, त्यासाठी निवडणूक आयोगाकडून तशा सूचना जारी केल्या जाणार आहेत.

आवश्यक कागदपत्रानंतर पुढील प्रक्रिया पार पडणार
दरम्यान, एसआयआर पूर्व मॅपिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष एसआयआरच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मात्र हा कार्यक्रम कधीपासून सुरू होईल ते अद्याप निश्चित व्हायचे असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष एसआयआरचे वेळापत्रक आणि त्यासाठी मतदारांकडून कोणती आवश्यक कागदपत्रे घ्यायची याची स्पष्टता आल्यानंतरच पुढील प्रक्रिया ठरवली जाणार आहे. मात्र मतदारांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title : मतदाता सूची मैपिंग में गडचिरोली आगे; मुंबई, पुणे, नागपुर पिछड़े।

Web Summary : महाराष्ट्र की मतदाता सूची संशोधन में गडचिरोली 90.51% मैपिंग के साथ आगे है। मुंबई, पुणे और ठाणे जैसे शहरी जिले प्रवास और मतदान बूथों में वृद्धि के कारण पीछे हैं। प्रक्रिया में बीएलओ द्वारा 2002 की सूची के खिलाफ सत्यापन शामिल है, जिसके लिए नए मतदाताओं को प्रमाण की आवश्यकता है।

Web Title : Gadchiroli leads voter list mapping; Mumbai, Pune, Nagpur lag behind.

Web Summary : Maharashtra's voter list revision shows Gadchiroli leading with 90.51% mapping. Urban districts like Mumbai, Pune, and Thane lag behind due to migration and increased polling booths. The process involves BLO verification against the 2002 list, requiring proof for new voters.