अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 10:22 IST2026-05-05T10:17:24+5:302026-05-05T10:22:34+5:30
Assembly Election 2026 Result : आसाम, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांत विधानसभाव निवडणुकीचे एकतर्फी निकाल लागले असले तरी काही मतदारसंघात मात्र टी-२० क्रिकेट सामन्याला लाजवेल असा थरार रंगला. त्यात एका मतदारसंघात तर अवघ्या एका मताने जय पराजयाचा फैसला झाला.

अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले आहेत. यात पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील निकालांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांत विधानसभाव निवडणुकीचे एकतर्फी निकाल लागले असले तरी काही मतदारसंघात मात्र टी-२० क्रिकेट सामन्याला लाजवेल असा थरार रंगला. त्यात एका मतदारसंघात तर अवघ्या एका मताने जय पराजयाचा फैसला झाला.
ही अटीतटीची लढत झाली ती तामिळनाडूमध्ये. येथे ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या विजय यांच्या पक्षाने द्रमुक आणि अण्णा द्रमुक प्रस्थापित पक्षांना धक्का देत सनसनाटी विजय मिळवला. येथीलच तिरुप्पूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत रंगली. या विधानसभा मतदारसंघात टीव्हीकेचे उमेदवार सिनिवास सेतुपती आर यांनी डीएमकेच्या उमेदवारावर अवघ्या एका मताने मात केली.

अटीतटीच्या झालेल्या या लढतीत टीव्हीकेच्या सिनिवास सेतुपती आर यांना ८३ हजार ३७५ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले डीएमकेचे पेरियाकरुपन यांना ८३ हजार ३७४ मते मिळाली. अशा प्रकारे सिनिवास सेतुपती यांनी अवघ्या एका मताने बाजी मारली. येथे भाजपाचे उमेदवार असलेले थिरुमरन के. सी. हे २९ हजार ५४ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
इतर राज्यांमधील कमी फरकाने झालेल्या लढतींचा विचार केल्यास केरळमधील मनालूर विधानसभा मतदारसंघात सीपीएमचे उमेदवार सी. रवींद्रनाथ यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर १२६ मतांनी मात केली. आसाममध्ये सर्वात कमी मतांनी विजय मिळवण्याचा विक्रम आसाम गण परिषदेचे प्रकाशचंद्र दास यांनी केला. त्यांनी सुआलकुची मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला ७२४ मतांनी पराभूत केले.
तर पश्चिम बंगालमध्ये राजारहाट न्यू टाऊन मतदारसंघात सर्वात अटीतटीची लढत झाली. या लढतीत तृणमूल काँग्रेसचे तापश चटर्जी यांनी भाजपाच्या उमेदवाराला केवळ ३२३ मतांनी पराभूत केले.