Crude Oil Price Today: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले आहेत. संयुक्त अरब अमिरातीनं (UAE) दावा केला आहे की इराणनं त्यांच्यावर क्षेपणास्त्रे डागलीत. या घटनेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. डब्ल्यूटीआय (WTI) क्रूड ऑईल १०५ डॉलर प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड ऑईल ११४ डॉलर प्रति बॅरलच्या पार गेलंय. ५ मे २०२६ (मंगळवार) रोजी किमतीत किरकोळ घसरण दिसत असली, तरी वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
युद्धविराम संपुष्टात आला का?
स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा हल्ले सुरू झाल्याच्या आणि युद्धविरामाबाबत अनिश्चितता वाढल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं की ते इराणवर हल्ला करणार नाहीत आणि इराण जोपर्यंत प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरू राहील. मात्र, आता पुन्हा सागरी मार्गांवर संघर्ष वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
संयुक्त अरब अमिरातीनं दिलेल्या माहितीनुसार, इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे फुजैराह तेल टर्मिनलमध्ये आग लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी समुद्रात अडकलेल्या व्यावसायिक जहाजांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचा दावा केला होता. जे देश मध्यपूर्वेतील तणावात सामील नाहीत आणि ज्यांचं नुकसान होत आहे, त्यांच्या जहाजांना या मार्गावरून जाऊ दिलं जाईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
स्ट्रेट ऑफ होर्मुज कधी उघडणार?
जोपर्यंत अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार होत नाही, तोपर्यंत या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून होणारा पुरवठा सामान्य होणं कठीण दिसत आहे. दोन्ही देश आपापल्या अटींवर ठाम आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यामुळे इराणचंही मोठे नुकसान होत आहे. भारतासह अनेक देशांना ऊर्जा पुरवठा संकटाचा सामना करावा लागत असून कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आयात बिल वाढत आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
निवडणुकीनंतरही सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करणार नाही, असं आश्वासन पेट्रोलियम मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. मात्र, आता निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यामुळे सरकारकडून किमती वाढवल्या जाऊ शकतात, असा दावा अनेक लोकांकडून केला जात आहे. काय आहेत नवे दर.
| शहर | पेट्रोलची किंमत (रुपये) | डिझेलची किंमत (रुपये) |
| दिल्ली | 94.77 | 87.67 |
| कोलकाता | 105.45 | 92.02 |
| मुंबई | 103.50 | 90.03 |
| गुरुग्राम | 95.65 | 88.10 |
| चेन्नई | 100.93 | 92.48 |
| नोएडा | 94.74 | 87.81 |
| बंगळुरू | 102.92 | 90.99 |
