अखिलेश यादव यांनी दोन मंत्र्यांना हटविले

By Admin | Updated: September 13, 2016 03:54 IST2016-09-13T03:54:39+5:302016-09-13T03:54:39+5:30

अखिलेश यादव यांनी सोमवारी दोन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती आणि राजकिशोर सिंह यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून हटविले आहे.

Akhilesh Yadav removed two ministers | अखिलेश यादव यांनी दोन मंत्र्यांना हटविले

अखिलेश यादव यांनी दोन मंत्र्यांना हटविले

मीना कमल , लखनौ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी दोन मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती आणि राजकिशोर सिंह यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून हटविले आहे. राजभवनच्या सूत्रांनी सांगितले की, खाणमंत्री गायत्री प्रसाद प्रजापती आणि पंचायत राजमंत्री राजकिशोर सिंह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले आहे.
प्रजापती यांच्यावर अवैध खाणींना पाठीशी घातल्याचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप अनेक दिवसांपासून होत आहे. सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. राज्यातील अनेक अवैध खाणींची दखल घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी सीबीआय चौकशीचे आणि सहा महिन्यांच्या आत अहवाल देण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज करून हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती; पण ९ सप्टेंबर रोजी न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. या कारवाईवर भाष्य करताना भाजपचे प्रदेश महासचिव विजय बहादूर पाठक म्हणाले की, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिखाऊ कारवाईऐवजी भ्रष्टाचाराचे मूळ विषय सार्वजनिक करून कारवाई करावी.

Web Title: Akhilesh Yadav removed two ministers