हवाई दलाचे सुखोई-३० रडारवरून गायब, काही वेळातच भीषण स्फोट, पायलट बेपत्ता; काय घडलं नेमकं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:34 IST2026-03-06T07:33:32+5:302026-03-06T07:34:28+5:30
भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील शक्तीशाली मानले जाणारे 'सुखोई-३० एमकेआय' हे लढाऊ विमान गुरुवारी संध्याकाळी आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळले.

हवाई दलाचे सुखोई-३० रडारवरून गायब, काही वेळातच भीषण स्फोट, पायलट बेपत्ता; काय घडलं नेमकं?
भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील शक्तीशाली मानले जाणारे 'सुखोई-३० एमकेआय' हे लढाऊ विमान गुरुवारी संध्याकाळी आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातानंतर विमानातील वैमानिकांचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नसून, हवाई दलाकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हे लढाऊ विमान प्रशिक्षणासाठी आसाममधील जोरहाट हवाई तळावरून झेपावले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काही वेळातच, म्हणजे गुरुवारी संध्याकाळी साधारण ७:४२ च्या सुमारास विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. विमान बेपत्ता झाल्याचे समजताच हवाई दलाची यंत्रणा सतर्क झाली. काही वेळातच कार्बी आंगलोंगच्या दुर्गम डोंगराळ भागात विमान कोसळल्याची माहिती समोर आली.
स्थानिकांच्या अंगाचा उडाला थरकाप!
हा अपघात इतका भीषण होता की, डोंगररांगांच्या दिशेने मोठा स्फोट झाल्याचा आवाज स्थानिकांनी ऐकला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळच्या वेळी अचानक ढगांच्या पलीकडून कानठळ्या बसवणारा आवाज आला आणि काही सेकंदातच डोंगराच्या दिशेने आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसू लागले. हा परिसर वस्तीपासून दूर असला तरी स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू
भारतीय वायुसेनेने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या अपघाताची पुष्टी केली आहे. जोरहाटपासून साधारण ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम भागात हे विमान कोसळले आहे. सध्या हवाई दल आणि स्थानिक प्रशासनाकडून संयुक्तपणे बचावकार्य राबवले जात आहे. मात्र, रात्रीची वेळ आणि दाट झाडी यामुळे शोधमोहिमेत काही अडथळे येत आहेत. बेपत्ता वैमानिकांचा शोध घेण्याला प्रशासनाचे पहिले प्राधान्य आहे.
'सुखोई-३०'ची ताकद आणि वैशिष्ट्ये
'सुखोई-३० एमकेआय' हे रशियन बनावटीचे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. यात दोन इंजिनं असून हे मल्टीरोल कामगिरी बजावण्यासाठी ओळखले जाते. ८ हजार किलो वजनापर्यंतची शस्त्रे वाहून नेण्याची याची क्षमता असून, हे विमान एकाच वेळी हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर अचूक मारा करू शकते. तब्बल ३ हजार किलोमीटर अंतरापर्यंत शत्रूचा वेध घेण्याची ताकद या विमानात आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला की अन्य काही कारणांमुळे, याचा तपास करण्यासाठी हवाई दलाकडून 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.