माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:31 IST2026-04-14T15:31:34+5:302026-04-14T15:31:56+5:30

तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू खाल्ल्याने ४ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला.

A child ate a poisonous laddoos meant to kill monkeys; the only child of 4 years old died of shock! | माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!

माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!

एकीकडे माकडांचा उच्छाद थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना, दुसरीकडे याच उपायांनी एका निष्पाप चिमुरड्याचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात घडली आहे. माकडांना मारण्यासाठी अन्नात मिसळलेले विष एका ४ वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले आहे. १३ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नेमकं काय घडलं?

गोविंदरावुपेट मंडळातील एनटीआर कॉलनीमध्ये राहणाऱ्या श्रवण यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. रविवारी १३ एप्रिल रोजी ४ वर्षांचा अश्विनी नंदन हा आपल्या बहिणींसोबत घरासमोर खेळत होता. खेळता खेळता त्याला तिथे पडलेला एक लाडू सापडला. हा लाडू पाहून लहानग्या अश्विनीला मोह आवरला नाही आणि त्याने तो घरी आणून खाल्ला. मात्र, हा लाडू नसून माकडांना मारण्यासाठी ठेवलेले मृत्यूचे गोळे होते.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच खेळ खलास

इतर मुलांनी लाडूचा वास किंवा रंग पाहून तो फेकून दिला, मात्र अश्विनीने तो खाल्ल्यामुळे काही वेळातच त्याची प्रकृती खालावली. त्याला उलट्या होऊ लागल्या आणि तो बेशुद्ध पडला. पालकांनी तातडीने त्याला एमजीएम रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. उपचारादरम्यान या चिमुरड्याने अखेरचा श्वास घेतला. एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आक्रोशाने संपूर्ण कॉलनी हळहळत आहे.

ग्रामपंचायतीच्या अजब कारभारावर संताप

स्थानिक नागरिकांनी असा आरोप केला आहे की, गावातील माकडांचा त्रास कमी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनीच अशा प्रकारे विषारी लाडू ठिकठिकाणी ठेवले होते. "प्राण्यांना मारण्यासाठी इतका घातक मार्ग अवलंबणे ही मोठी चूक आहे. या निष्काळजीपणामुळे आज एका घराचा दिवा विझला," अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पोलीस तपास सुरू

या घटनेनंतर प्राणीमित्र आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हे विषारी पदार्थ नेमके कुणी आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवले होते, याचा तपास सुरू केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Web Title : बंदरों के लिए रखा जहरीला लड्डू खाने से 4 साल के बच्चे की मौत

Web Summary : तेलंगाना में एक दुखद घटना: बंदरों के लिए रखे जहरीले भोजन को खाने से 4 साल के बच्चे की मौत हो गई। ग्रामीणों का आरोप है कि बंदरों को नियंत्रित करने के लिए ग्राम पंचायत कर्मचारियों ने जहर रखा था, जिससे आक्रोश फैल गया और पुलिस ने जांच शुरू कर दी है।

Web Title : Poisoned treat meant for monkeys kills 4-year-old boy.

Web Summary : A tragic incident in Telangana: a 4-year-old died after eating poison-laced food intended for monkeys. The food was allegedly placed by village officials to control the monkey population, sparking outrage and prompting a police investigation into the negligent act.