"शुभेंदू अधिकारींनी घरात घुसून हरवलं"; ममता बॅनर्जींच्या पराभवावरून अमित शाहंचा बोचरा वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:22 IST2026-05-08T19:17:08+5:302026-05-08T19:22:18+5:30
पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा सुपडा साफ झाला आहे अशा शब्दात गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सुनावले.

"शुभेंदू अधिकारींनी घरात घुसून हरवलं"; ममता बॅनर्जींच्या पराभवावरून अमित शाहंचा बोचरा वार
HM Amit Shah on Mamata Banerjee: "ज्याप्रमाणे आम्ही आसाममध्ये पूर्णपणे घुसखोरी रोखली, त्याचप्रमाणे आता बंगालमध्येही घुसखोरी आणि गो तस्करीवर कायमचा लगाम लावला जाईल," अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सुनावले. कोलकाता येथे पार पडलेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अमित शाह यांनी शुभेंदू अधिकारी यांची भाजप विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे आगामी मुख्यमंत्री म्हणून अधिकृत घोषणा केली.
ममतांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांना हरवले!
अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर बोचरी टीका करताना म्हटले की, "शुभेंदू दांनी ममता बॅनर्जींना त्यांच्या स्वतःच्या घरात (भवानीपूर) जाऊन पराभूत केले आहे. भवानीपूर हा दक्षिण कोलकात्याचा त्यांचा सर्वात मोठा बालेकिल्ला होता, तिथेच दीदींचा सुपडा साफ झाला आहे." २०२१ मध्ये नंदीग्राम आणि आता २०२६ मध्ये भवानीपूर अशा दोन वेगवेगळ्या मतदारसंघांत शुभेंदू यांनी ममतांना मात देऊन आपली ताकद सिद्ध केली आहे.
बंगालमध्ये भाजपला २०७ जागांसह प्रचंड कौल मिळाला आहे. भाजपच्या आमदारांच्या विजयाचे सरासरी अंतर तब्बल २८ हजार मते आहे. राज्यातील २३ पैकी ९ जिल्ह्यांत तृणमूल काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तर २० जिल्ह्यांत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. १९५० मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पाहिलेले स्वप्न आज त्यांच्या जन्मभूमीत साकार झाले आहे. ते जिथे कुठे असतील, तिथून हे पाहून नक्कीच सुखावले असतील," असे भावूक उद्गार शाह यांनी काढले.
३२१ कार्यकर्त्यांचे बलिदान
हा विजय केवळ सुखद नाही, तर त्यामागे वेदनादायी संघर्ष आहे. या प्रवासात भाजपच्या ३२१ कार्यकर्त्यांनी आपला जीव गमावला आहे, त्यांना शाह यांनी आदरांजली वाहिली. शाह यांनी स्पष्ट केले की, नवीन सरकार राज्यात कायद्याचे राज्य स्थापन करेल. ममतांच्या काळात राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले होते, ते आता संपवले जाईल. तसेच ९३ टक्क्यांहून अधिक मतदान होऊनही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, याबद्दल त्यांनी सुरक्षा दलांचे आणि निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले.