३०० अन्य भाषिकांनी गिरविले उर्दूचे धडे

By Admin | Updated: January 31, 2016 00:03 IST2016-01-31T00:02:07+5:302016-01-31T00:03:02+5:30

पदविका अभ्यासक्रम : उर्दू साहित्याविषयी अभिरुची

Urdu Lessons Learned by 300 Other Lenders | ३०० अन्य भाषिकांनी गिरविले उर्दूचे धडे

३०० अन्य भाषिकांनी गिरविले उर्दूचे धडे

नाशिक : गुलशनाबाद असे नाशिकचे जुने नाव. या शहराला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांचा वारसा आहे. त्यामुळे येथील मातीत प्रत्येक भाषेच्या गोडव्याचा सुगंध जाणवतो. यामुळेच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बिगर उर्दू भाषिकांचाही उर्दू शिकण्याकडे कल वाढल्याचे दिसून येते. सारडा सर्कलवरील नॅशनल उर्दू शाळेत शासनामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या एक वर्षाच्या उर्दू पदविका अभ्यासक्रमाला उच्च शिक्षितांची पसंती वाढत असून, गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे तीनशेहून अधिक अन्य भाषिकांनी उर्दूचे धडे गिरविले
आहे.
मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून नॅशनल उर्दू शाळेमध्ये मागील बारा वर्षांपासून एक वर्षाचा उर्दू पदविका अभ्यासक्रम व दोन वर्षीय अरेबिक भाषेचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या पदविका अभ्यासक्रमाला राष्ट्रीय उर्दू भाषा प्रचार-प्रसार परिषदेचीदेखील मान्यता असल्याचे व्यवस्थापन मंडळाचे सचिव जाहीद शेख यांनी सांगितले. देशात उर्दूचा प्रचार-प्रसार व्हावा, उर्दू साहित्याचे अवकाश जाणून घेता यावे, जेणेकरून या भाषेतील साहित्यामधून लोकांचे ज्ञान अधिकाधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल, म्हणून देशभर विविध उपक्रम राबविले जातात.
याचाच एक भाग म्हणून गेल्या एका तपापासून शहरात बिगर उर्दू भाषिकांसाठी उर्दू भाषेचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम सातत्याने शिकविला जात आहे. यावर्षी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची रविवारपर्यंत (दि.३१) मुदत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Urdu Lessons Learned by 300 Other Lenders