जुगाराचे डाव पोलिसांनी उधळले

By Admin | Updated: January 20, 2017 01:00 IST2017-01-20T01:00:01+5:302017-01-20T01:00:16+5:30

पंधरा हजार जप्त : चार जुगार अड्ड्यांवर धाडी

The police jumped out of gambling | जुगाराचे डाव पोलिसांनी उधळले

जुगाराचे डाव पोलिसांनी उधळले

नाशिक : शहरात वाढलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा वक्रदृष्टी केली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी परिसरातील चार ठिकाणी रंगलेले जुगाराचे डाव उधळले. संशयित जुगाऱ्यांकडून सुमारे पंधरा हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.
भद्रकालीतील तलवाडी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा मारला. यावेळी रियाज शेख, राधाकिसन खांबेकर, सचिन इंगोले, अजिज शेख, सलीम पठाण व विष्णू आदमाने यांनी जुगाराचा डाव रंगविल्याचे आढळून आले. पोलिसांनी जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नऊ हजार चारशे रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
दुसऱ्या कारवाईत बागवानपुऱ्यातील हरी मंजीलच्या बाजूला सुरू असलेला जुगाराचा डाव पोलिसांनी उधळून उत्तम रनमाळे, शहिद शेख , पांडूरंग वाघ आदिंना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन हजार २२० रुपयांची रोकड जप्त केली आहे. त्र्यंबकनाक्यावरील शाळेच्या खुल्या जागेत तसकर रंगरेज व रवि चव्हाण हे आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ५१० रुपये जप्त केले आहे. नानावलीतील स्मशानभूमी परिसरात जुगार खेळणारे देवानंद चौधरी, अफरोज खान, सुनील सहाणेआदिंना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त केली
आहे.
एकूणच भद्रकाली भागात चार ठिकाणी सुरू असलेले जुगार अड्डे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. ज्याप्रमाणे जुगार अड्ड्यांवर भद्रकाली पोलिसांनी कारवाई केली त्याप्रमाणे हद्दीमधील अन्य अवैध धंद्यांचा उपद्रवही थांबवावा, अशी मागणी होत आहे. किरकोळ जुगार अड्ड्यांसह, अवैध मद्यविक्री, गांजाविक्री, मटका, बॉलगेम, रोलेटसारखे अवैध धंद्यांवरही धाड टाकून मोठे मासेही गळाला लावल्यास गुन्हेगारीला आळा बसेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The police jumped out of gambling