पवार यांनी धीर दिला; आता शासनाकडून मदतीची अपेक्षा

By किरण अग्रवाल | Published: November 3, 2019 12:53 AM2019-11-03T00:53:33+5:302019-11-03T00:57:38+5:30

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्यांकडे लक्ष पुरविण्यात परतून आलेल्या राज्यकर्त्यांना काहीसा विलंब झाल्याचेच दिसून आले आहे. अशात, शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यात दौरा करून नुकसान-ग्रस्तांच्या मनातील उमेद जागवतानाच नेतृत्वाची कशी संवेदनशीलता असावी लागते, याचा परिचयही घडवून दिला आहे.

Pawar gave courage; Expect help from the government now | पवार यांनी धीर दिला; आता शासनाकडून मदतीची अपेक्षा

पवार यांनी धीर दिला; आता शासनाकडून मदतीची अपेक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देपरतीच्या पावसाने घडविलेले नुकसान मोठेपीकविम्याचे निकष बदलण्याची व नुकसानीच्या सरसकट पंचनाम्यांची गरज

सारांश


परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा हृदय पिळवटून टाकणाºया आहेत. निसर्गाने अनेकांची स्वप्ने उद्ध्वस्त केली असली तरी मायबाप सरकारने अशावेळी नुकसानग्रस्तांच्या मनात आशेचे व उमेदीचे दिवे लावणे गरजेचे आहे. पण ते सत्तेची समीकरणे जुळविण्यात मशगूल आहेत. अशावेळी अन्य सारी कामे बाजूस सारून व प्रकृतीच्या कटकटींकडे दुर्लक्ष करून शरद पवार धावून आलेत. त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधाबांधांवर जात त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. सत्तेत नसले तरी या नेत्याचे मोठेपण का टिकून आहे याची प्रचिती यानिमित्ताने पुन्हा आली.

नाशिक जिल्ह्यात प्राथमिक अवस्थेत हाती आलेल्या माहितीनुसार सुमारे तीन लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पण, यंदा मुंबईत सत्तेची जुळवाजुळव करण्यात गुंतलेल्यांनी या आपत्तीकडे तातडीने लक्ष पुरविले नाही, परिणामी नुकसानग्रस्तांच्या व्यथा-वेदनांना पारावार उरला नाही. महत्त्वाचे म्हणजे, होत्याचे नव्हते करून टाकणारी ही आपत्ती आहे. त्यामुळे तत्काळ यंत्रणा गतिमान करीत नुकसानग्रस्तांना धीर दिला जाणे अपेक्षित होते. पण अधिकृतपणे पालकत्वाची जबाबदारी असलेल्यांकडून पाहणी होऊ शकली नाही. म्हणायला, राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मोजक्या ठिकाणी भेटी दिल्या. परंतु नुकसानग्रस्तांना सहानुभूतीचे दोन शब्द ऐकवण्याऐवजी ‘कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही’, अशी भलतीच वक्तव्ये करीत त्यांनी मूळ आपत्तीतले गांभीर्य हरवून टाकले. जबाबदार नेत्यांनी वेळ व प्रसंगाची समयोचितता पाहून बोलणे अपेक्षित असते. निव्वळ सनसनाटीपणा करण्याने वेळ निभावून जाते; पण प्रश्न कायम राहतो. सदाभाऊंनी त्याचाच विचार केला नाही. कांदा उत्पादकांच्या बाजूने भूमिका मांडताना उगाच शहरी ग्राहकांना डिवचण्याचे खरे तर काही कारण नव्हते. खाणाºयांनी कांदा खायचाच नाही, म्हणजे मागणी राहणार नसेल तर या शेतमालाला भाव कसा मिळणार हे साधे गणित शेतकरी नेते असलेल्या खोत यांना ठाऊक नसेल, असे कसे म्हणता यावे?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र १२ तासांत ३५० कि.मी.चा प्रवास करीत अगदी इगतपुरीपासून ते बागलाणमधील शेतकºयांच्या बांधांवर जाऊन नुकसानीची पाहणी केली. साहेब येणार म्हणून अनेक ठिकाणी सकाळपासून शेतकरी रस्त्यावर वाट बघत उभे असलेले दिसून आले. कुणीतरी येतोय, तो आपले दु:ख समजून घेईल व मार्ग काढेल, त्यातून मदतीचा दरवाजा उघडू शकेल, असा विश्वास या प्रतीक्षेमागे होता. सत्तेत नसणाºयाबद्दलही अशी विश्वासार्हता असणे, हेच खूप बोलके ठरावे. किंबहुना सत्ताधाºयांबद्दलचा अविश्वास यातून स्पष्ट व्हावा. पवारांचे नेतेपण व मोठेपणही अबाधित आहे, ते या विश्वासाच्या धाग्यातून. यातील सरकारी यंत्रणेबद्दलचा रोष का, तर नुकसानीचे पंचनामे गतीने होत नाहीयेत. शिवाय, जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँका पीककर्ज देत नाहीत, उलट कर्जवसुलीच्या नोटिसा बजावल्या गेल्याची ओरड मोठ्या प्रमाणात आहे. पीकविम्याचे निकष असे आहेत, की कुणाचेच समाधान होऊ शकणारे नाही. दुर्दैव म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षांतील नुकसानीचेच पीकविमे अद्याप मिळालेले नाहीत अशाही तक्रारी आहेत. सर्वच प्रकारच्या शेतपिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जावी व कर्जमाफी घोषित करायला हवी, अशी रास्त अपेक्षा आहे. पाठपुरावा करून सरकारला त्यासाठी भाग पाडण्याचा शब्द पवार यांनी दिला आहे. त्यांनी दिलेल्या या धीरातून नुकसानग्रस्तांचे मनोबल उंचावणारे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, निवडून आलेल्यांच्याच नव्हे तर आपल्या पराभूत उमेदवारांच्या परिसरातही पवार गेलेत. यातून संवेदनशीलतेसोबतच त्यांची सर्वसमावेशकताही लक्षात यावी. नाशकातील प्रख्यात चित्रकार शिशिर शिंदे यांनी याच अनुषंगाने समस्यांचा व अपेक्षांचाही डोंगर उचलणाºया शरद पवार यांचे जे चित्र यानिमित्ताने चितारले आहे, ते सयुक्तिकच म्हणता यावे. या चित्र व समस्याग्रस्तांच्या स्वप्नांचा प्रवास दिलाशाच्या मुक्कामी पोहोचावा इतकेच यानिमित्ताने.
 

Web Title: Pawar gave courage; Expect help from the government now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.