एकाच्या पापाची शिक्षा इतरांना का? नाशिकमध्ये संबंध नसलेल्यांना अडकवल्याचा आरोपींच्या पत्नींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:58 IST2026-04-15T13:49:55+5:302026-04-15T13:58:45+5:30
नाशिक टीसीएस प्रकरणात आरोपींच्या पत्नीने अनेक धक्कादायक दावे केले आहेत.

एकाच्या पापाची शिक्षा इतरांना का? नाशिकमध्ये संबंध नसलेल्यांना अडकवल्याचा आरोपींच्या पत्नींचा दावा
Nashik TCS Case: नाशिकच्या टीसीएमध्ये जे काही घडलं, ते एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षाही कमी नाहीये. टीसीएसमध्ये सुरू असलेल्या या वादात आता नवा ट्विस्ट आला आहे. अटकेत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या पत्नीने तिची बाजू मांडताना खळबळजनक आरोप केले आहेत. एक केस दुसऱ्या केसमध्ये उगाचच मिसळली जातेय आणि ज्यांचा काहीच संबंध नाही अशा लोकांना यात विनाकारण अडकवलं जातंय, असा दावा तिने केला आहे.
या प्रकरणाची सुरुवात दानिश नावाच्या कर्मचाऱ्यामुळे झाली. दानिशवर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आणि पीडितेला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. मात्र आरोपीच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, "दानिश आणि पीडित महिला रिलेशनशिपमध्ये होते ही गोष्ट ऑफिसमध्ये सर्वांना माहीत होती. फेब्रुवारीमध्ये दानिश आणि त्याच्या मैत्रिणीमध्ये वाद झाला होता, हे मला माहीत होतं. त्यानंतर त्या तरुणीच्या पालकांनी काही राजकीय नेत्यांशी संपर्क साधला. त्या नेत्यांनीच त्या तरुणीला पोलिसात तक्रार करण्यासाठी तयार केलं. या सगळ्या राड्यात माझ्या पतीसह इतरांनाही विनाकारण ओढलं गेलं, त्यांचा या प्रकरणाशी लांबलांबपर्यंत काहीही संबंध नव्हता."
वरिष्ठ इंजिनिअरवर गंभीर आरोप
एफआयआरमध्ये त्या वरिष्ठ इंजिनिअरवर महिलेने गंभीर आरोप केले. "२०२३ मध्ये जेव्हा मी त्याच्या टीममध्ये गेले, तेव्हा तो माझ्याशी डबल मिनिंग बोलायचा आणि मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. जेव्हा मी याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली, तेव्हा त्यांनी मला सांगितले की याच्याबद्दल आधीही अशाच तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे तूच सावध राहा. २०२५ मध्ये माझे लग्न झाल्यानंतर जेव्हा मी गोव्याला जाण्यासाठी रजेचा अर्ज घेऊन गेले, तेव्हा त्याने मला तू हनिमूनला जातेयस का? आणि तू दारू पितेस का? असे प्रश्न विचारले. इतकेच नाही, तर मी त्याच्याविरुद्ध तक्रार केल्याचे समजताच त्याने मुद्दाम मला जास्तीचे काम करायला लावले," असं महिलेने सांगितले.
आरोपीच्या पत्नीचे सवाल
अटकेत असलेल्या त्या वरिष्ठ इंजिनिअरच्या पत्नीने पोलिसांच्या कामकाजावर गंभीर आरोप केले. जेव्हा दानिशवर गुन्हा दाखल झाला, तेव्हा माझा पती सुट्टीवर होता. त्याचा आणि दानिशचा कधीही जवळचा संबंध नव्हता. १ एप्रिल रोजी पोलिसांनी तपासासाठी सही हवी आहे, असं सांगून बोलावले आणि रात्री ११:३० वाजता अचानक अटक केल्याचे सांगितले.
वेगळे एफआयआर नोंदवले
जेव्हा ती महिला पोलीस स्टेशनला पोहोचली, तेव्हा तिला सांगण्यात आलं की तुमच्या दानिशच्या केसमध्ये नाही, तर इतर महिलांनी दिलेल्या तक्रारींवरून अटक झाली आहे. धर्मांतराच्या आरोपांवर बोलताना ती म्हणाली की, "माझा पती शाकाहारी आहे आणि तो ऑफिसला डबा घेऊन जातो. सहकाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून तो मांसाहारही करत नाही, असा माणूस दुसऱ्या धर्माचा अपमान कसा करू शकेल?" कर्मचाऱ्याच्या पत्नीने सांगितले की, अटकेत असलेले सर्व आरोपी इंजिनिअर्स आहेत. त्यापैकी एक तर नुकताच कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे भरती झाला आहे. त्याला कंपनीत येऊन जेमतेम तीन महिनेच झाले होते."
एसआयटी आणि कंपनीची भूमिका
दुसरीकडे, एसआयटी आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पोलिसांनी मॅजिस्ट्रेटसमोर महिलांचे जबाब नोंदवले असून त्या आधारावरच कारवाई केल्याचे म्हटले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले असून, सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
पॉश कमिटीच्या भूमिकेवर संशय
या प्रकरणात अश्विनी चैनानी आणि निदा खान या महिलांची नावेही चर्चेत आहेत. एका पीडित महिलेने चैनानी यांना भेटून आपल्यासोबत होणाऱ्या लैंगिक छळाबद्दल तोंडी तक्रार केली होती. मात्र, चैनानी यांनी त्या महिलेला तक्रार करण्यापासून रोखले असा आरोप आहे.
या प्रकरणात दानिशविरुद्ध पहिली एफआयआर २६ मार्च रोजी नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्याच्याविरोधात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांपैकी फक्त याच एका गुन्ह्यात बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. या पहिल्या गुन्ह्याचा तपास करत असतानाच नाशिक पोलिसांनी इतर प्रकाराची माहिती मिळाली. त्यानंतर आठ नवीन गुन्हे दाखल झाले.
दानिशचे प्रकरण काय होतं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिशवर तक्रार करणारी महिला आणि दानिश हे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, दानिशने आपण विवाहित असल्याचे त्या महिलेपासून लपवून ठेवले होते. एफआयआर दाखल होण्याच्या एक महिना आधी, म्हणजेच फेब्रुवारीमध्ये, दानिशच्या पत्नीनेच त्या पीडित महिलेला मेसेज केला होता. या मेसेजद्वारे तिने दानिशचे लग्न झाले असून त्याला दोन मुले असल्याची माहिती पीडितेला दिली होती. दानिशने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते, त्यामुळे त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.