महापालिका नेमणार ‘स्वच्छतादूत’

By Admin | Updated: December 22, 2015 00:07 IST2015-12-22T00:04:58+5:302015-12-22T00:07:25+5:30

स्वच्छ भारत अभियान : कविता राऊतसह अनेक नावे चर्चेत

NMC to appoint 'Cleaner' | महापालिका नेमणार ‘स्वच्छतादूत’

महापालिका नेमणार ‘स्वच्छतादूत’

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत जनमानसात स्वच्छतेविषयीचा जागर होण्यासाठी आणि लोकांपर्यंत शासनाच्या योजना नेऊन पोहोचविण्यासाठी महापालिका ‘स्वच्छतादूत’ (ब्रॅण्ड अम्बॅसेडर) नेमणार असून, आंतरराष्ट्रीय धावपटू आणि सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊतसह अनेक मान्यवरांची नावे चर्चेत आहेत.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेकडून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येणार आहेत. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालय उभारण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान वाटपाचे काम नुकतेच सुरू केले आहे. शिवाय, परिसर स्वच्छतेसंबंधी जनमानसात व्यापक स्तरावर जागृतीही केली जाणार आहे. महापालिकेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम आणि शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेऊन पोहोचविण्यासाठी ‘स्वच्छतादूत’ नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नामवंत कलावंत, खेळाडू तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संपर्क साधून त्यांची सहमती मिळविली आहे. त्यात प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावणारे चित्रकार, कलावंत आदिंचा समावेश असून, अनेक नावांची शिफारस येत्या महासभेवर करण्यात येणार आहे. त्यातील अंतिम नावांवर महासभा शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर हा एकच असला पाहिजे यावर महासभेचे एकमत होण्याची शक्यता असून, कविता राऊत यांच्याच नावावर सहमती होण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.

Web Title: NMC to appoint 'Cleaner'