खोटी सही, बनावट शिक्का अन् ४ कोटींचा गंडा; नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 18:24 IST2026-05-12T18:21:07+5:302026-05-12T18:24:01+5:30

आयुक्तांच्या सहीचा गैरवापर करून ४ कोटी लुटणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी पकडलं.

Nashik Kumbh Mela Scam 4 Crore Fraud Unearthed Involving Fake Government Seals and Signatures | खोटी सही, बनावट शिक्का अन् ४ कोटींचा गंडा; नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने घोटाळा

खोटी सही, बनावट शिक्का अन् ४ कोटींचा गंडा; नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने घोटाळा

Nashik Kumbh Mela: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरु असतानाच नाशिकमध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाखाली तब्बल ४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभिषेक झेरे याला बेड्या ठोकल्या आहेत. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून इतक्या मोठ्या रकमेवर डल्ला मारल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बनावट सही आणि शिक्क्यांचा मास्टरप्लॅन

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अभिषेक झेरे याने कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट स्वाक्षरी आणि बनावट शासकीय शिक्क्यांचा वापर केला. या माध्यमातून त्याने ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती आणि रुग्णालयांच्या स्थलांतराबाबतच्या खोट्या वर्क ऑर्डर तयार केल्या. या बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याने शासनाची दिशाभूल करत ४ कोटी रुपयांचा लुटल्याचे तपासात समोर आले.

७० कोटींचा 'एआय' प्रकल्प अन् फसवणुकीचे जाळे

अभिषेक झेरे याने केवळ ४ कोटींवरच समाधान मानले नव्हते, तर त्याने चक्क ७० कोटी रुपयांच्या बनावट प्रकल्पाचाही बनाव रचला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सीसीटीव्ही प्रकल्प आणि सुरक्षा यंत्रणेचे मोठे कंत्राट मिळाल्याचा दावा त्याने केला होता. त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय आणि वाहतूक नियोजनाच्या नावाखाली त्याने हा घोटाळा करण्याचे नियोजन केले होते. मात्र, कागदपत्रांच्या पडताळणीदरम्यान आयुक्तांची स्वाक्षरी आणि शिक्के बनावट असल्याचे लक्षात येताच हा संपूर्ण प्रकार उघड झाला.

गुन्हेगारीचा जुना इतिहास; ठाण्यातून अटक

नाशिक पोलिसांनी संशयित अभिषेक झेरे याला ठाण्यातून अटक केली आहे. तपासादरम्यान झेरे हा यापूर्वीही अशाच प्रकारच्या ७० कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात गुंतलेला होता. त्याने यापूर्वीही शासकीय अधिकारी असल्याचा आभास निर्माण करून अनेकांना गंडा घातल्याचा संशय आहे.

दरम्यान, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा घोटाळा समोर आल्याने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. यामागे आणखी काही लोकांचे हात आहेत का? आणि या ४ कोटींच्या रकमेचा वापर कुठे झाला? याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.

Web Title : फ़र्ज़ी हस्ताक्षर, मुहरें: नासिक कुंभ मेले में ₹4 करोड़ का घोटाला उजागर।

Web Summary : नासिक में कुंभ मेला प्राधिकरण के फ़र्ज़ी हस्ताक्षरों का उपयोग करके ₹4 करोड़ का घोटाला उजागर हुआ है। अभिषेक ज़ेरे को दस्तावेज़ों में जालसाज़ी करने के आरोप में गिरफ़्तार किया गया। उसने ₹70 करोड़ की एक कृत्रिम बुद्धिमत्ता परियोजना भी बनाई। पुलिस जाँच कर रही है।

Web Title : Fake signatures, stamps: ₹4 crore fraud exposed in Nashik Kumbh Mela.

Web Summary : A ₹4 crore fraud using fake Kumbh Mela authority signatures has been uncovered in Nashik. Abhishek Zere was arrested for forging documents. He also fabricated a ₹70 crore AI project. Police are investigating.