नाशिक : राज्यातील २८८ आमदारांमधील तीन आमदारांनी बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविले असून, त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती माजी मंत्री मधुकरराव पिचड व पद्माकर वळवी यांनी दिली.चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे मूळ कोळी या विशेष मागास प्रवर्गातील असताना त्यांनी अनुसूचित जमातीतील टोकरी कोळी प्रमाणपत्र मिळवून आमदारकी लढविली आहे. आरमोरी (गडचिरोली)चे भाजपाचे आमदार कृष्णा गजबे हे कुणबी माना या बिगर आदिवासी जमातीतील असताना त्यांनी गौड माना जमातीचे प्रमाणपत्र मिळवून आमदारकी लढविली आहे. बागलाण (नाशिक) च्या आमदार दीपिका संजय चव्हाण भाट ठाकूर समाजातील असून, त्यांनी आदिवासी ठाकूर समाजातून आमदारकी लढविली आहे, असेही त्यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी नाशिकचे बॅँकींग क्षेत्रातील व्यावसायिक विश्वास ठाकूर यांच्याही जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा दावा केला. पडताळणी हवी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्राची पडताळणी करणे बंधनकारक असते. तो नियम आमदार व खासदारांना लागू नाही. त्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र पडताळणी करणे बंधनकारक करण्यात यावे, असे पद्माकर वळवी व मधुकरराव पिचड यांनी सांगितले.