मार्गदर्शक माहिती : साधुग्राममध्येही लावणार नकाशे

By Admin | Updated: March 24, 2015 00:01 IST2015-03-24T00:01:31+5:302015-03-24T00:01:40+5:30

पालिका बनविणार कुंभमेळ्याचे अ‍ॅप

Guideline: Maps will also be installed in Sadhugram | मार्गदर्शक माहिती : साधुग्राममध्येही लावणार नकाशे

मार्गदर्शक माहिती : साधुग्राममध्येही लावणार नकाशे

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात शहरात दाखल होणाऱ्या भाविकांना आपल्या भ्रमणध्वनीवर रस्ते, महत्त्वाची ठिकाणे, हॉस्पिटल्स, लॉजेस, धर्मशाळा यांसह उपयुक्त अशी माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिका अ‍ॅप विकसित करणार असल्याचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले. दरम्यान, साधुग्रामसह तपोवनातील दहाही सेक्टर्समध्ये माहितीपर नकाशे उभारण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
आयुक्त डॉ. गेडाम यांनी सोमवारी तपोवनातील साधुग्रामसह सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. त्याबाबत आयुक्तांनी सांगितले, कुंभमेळ्यात पर्वणीकाळात कोट्यवधी भाविक शहरात दाखल होणार आहेत. या भाविकांना गोदाघाटाकडे जाणारे रस्ते, त्यांचे अंतर, महापालिकेची रुग्णालये तसेच आरोग्य सुविधा केंद्र यापासून ते पर्वणीकाळाचे नियोजन यासंबंधीची माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी, याकरिता महापालिका स्वत:च कुंभमेळाविषयक अ‍ॅप तयार करत असून, भाविकांना त्यासाठी कुठेही चौकशी करावी लागू नये, अशी व्यवस्था साकारण्याची तयारी सुरू आहे. सदर अ‍ॅप पर्वणीकाळातील तीन महिन्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. याशिवाय महापालिकेच्याही संकेतस्थळाची पुनर्रचना करण्यात येत आहे.
दरम्यान, तपोवनातील साधुग्राममध्ये प्रत्येक सेक्टरच्या प्रवेशद्वारावर १० बाय १५ चा सर्व माहिती देणारा नकाशा लावण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये किती रस्ते आहेत, प्लॉट नंबर्स, संबंधित अधिकारी व त्यांचे भ्रमणध्वनी नंबर्स, कॉल सेंटर व हेल्पलाइनचे नंबर यांची माहिती समाविष्ट केली जाणार आहे. प्रत्येक सेक्टरसाठी दोन कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली जाणार असून, त्यांच्यामार्फत त्या-त्या सेक्टरचे नियंत्रण केले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)

Web Title: Guideline: Maps will also be installed in Sadhugram