नवापुर चेकपोस्टवर सात हजार परप्रांतीयांची सोय करताना अधिकाऱ्यांचे ‘जागते रहो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:36 IST2020-05-21T12:36:08+5:302020-05-21T12:36:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : राज्याच्या सीमेवर परप्रांतीय मजुर व कामगार यांचा मोठा जत्था काल सायंकाळी अचानक दाखल झाल्याने ...

Officials keep 'awake' while accommodating 7,000 foreigners at Navapur checkpost | नवापुर चेकपोस्टवर सात हजार परप्रांतीयांची सोय करताना अधिकाऱ्यांचे ‘जागते रहो’

नवापुर चेकपोस्टवर सात हजार परप्रांतीयांची सोय करताना अधिकाऱ्यांचे ‘जागते रहो’

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : राज्याच्या सीमेवर परप्रांतीय मजुर व कामगार यांचा मोठा जत्था काल सायंकाळी अचानक दाखल झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. सात हजाराहुन अधिकच्या जमावाची सोय करता करता अधिकाऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागले.
राज्यशासनाने मजूर व कामगार तथा सामान्य माणसासाठी एसटीची सोय उपलब्ध करुन दिल्याने पायपीट करुन घरवापसी करणाºयांची चांगली सोय झाली आहे. बिहार, मध्यप्रदेश, ओडीसा व राज्यातील कामगार तथा मजूर वर्ग मोठ्या संख्येने गुजरातमध्ये अडकले होते. नवापुर आगारावर ही जबाबदारी आल्याने नियोजनबध्द पध्दतीने लालपरीची सेवा उपलब्ध करुन दिली जात होती. मजूर व कामगार खाजगी वाहनांमधुनही प्रवास करीत होते. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात खाजगी प्रवासी वाहतूकीवर निर्बंध टाकण्यात आल्याने लोकांना एसटी शिवाय पर्यायच उरला नाही. मंगळवारी सायंकाळी असंख्य वाहनांमधून हजारो नागरिक गुजरात सीमेवर उतरुन राज्य सीमा परिवहन तपासणी नाक्यावर दाखल होण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता ही संख्या सात हजाराच्या पार झाली. गुजरात मधील हॉटस्पॉट भागातील नागरीकही त्यात समाविष्ट होते. सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडत असल्याने नंदुरबार येथुन अतिरिक्त पोलीस बल मागविण्यात आले. अचानक मोठा जमाव आल्याने परिवहन विभागाच्या नियोजनाचा खोळंबा झाला. प्रशासनाला आधीच केलेल्या नियोजनात वेगळे नियोजन करावे लागले. त्यातही वाहनांची तेवढी संख्या नसल्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इतर आगारांमधून वाहने बोलाविण्यात आली. या सर्व प्रक्रियांसाठी वेळ गेल्याने जमावास रोखुन धरण्यात आले. पोलीस प्रशासन व आगारातील अधिकारी कर्मचारी यांना तर ही कसरत पार पाडतांना रात्र कुठे पसार झाली हे देखील कळाले नाही.
सीमा परिवहन तपासणी नाक्याचे संचालन एका खाजगी कंपनीकडून केले जाते़ येथील आधुनिक सोयी सुविधा नावालाच आहेत. तेथील सार्वजनिक स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आल्याने आबालवृध्द व महिलांचे हाल झाले़
दरम्यान नवापुर येथून २५ हजार लोकांना इच्छितस्थळी पोहोचविण्यात आले आहे. आजही सीमा परिवहन तपासणी नाक्यावर दोन हजाराचा जमाव होता.

Web Title: Officials keep 'awake' while accommodating 7,000 foreigners at Navapur checkpost