NEET Paper Leak: लातूरनंतर नांदेड-वाशिमचे 'मालदार' पालक CBIच्या रडारवर; १० लाखांच्या पेपरचे 'मल्टिपल डिलिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:13 IST2026-05-16T18:13:10+5:302026-05-16T18:13:39+5:30

आधी फ्री टेस्ट सिरीजचा 'ट्रॅप', मग हॉटेल्समध्ये सिक्रेट डिलिंग! नीट पेपरफुटीत पालकांनीच पालकांना कसं फसवंलं?

NEET UG 2026 Paper Leak: Multiple Dealing of Rs 10 Lakh Question Paper Exposed in Nanded and Latur | NEET Paper Leak: लातूरनंतर नांदेड-वाशिमचे 'मालदार' पालक CBIच्या रडारवर; १० लाखांच्या पेपरचे 'मल्टिपल डिलिंग'

NEET Paper Leak: लातूरनंतर नांदेड-वाशिमचे 'मालदार' पालक CBIच्या रडारवर; १० लाखांच्या पेपरचे 'मल्टिपल डिलिंग'

- श्रीनिवास भोसले
नांदेड :
नीट-युजी २०२६ च्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेधोरे लातूरपर्यंत येऊन पोहोचले असतानाच, या महाठगांनी आजु-बाजूच्या जिल्ह्यातील अनेक पालकांना हेरले होते, अशी माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळत आहे. हे रॅकेट केवळ पेपर विकण्यापुरते मर्यादित नसून, बड्या कमाईच्या आणि पांढरपेशा पालकांना हेरून त्यांना ‘साखळी पद्धतीच्या’ सापळ्यातही सहभागी करून घेतले गेले. त्यामुळे आता पैसे देऊन पेपर खरेदी केलेले अनेक पालक मोबाइल बंद करून भूमिगत झाल्याची चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत विचारपूर्वक आखलेली होती. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर महिनाभरापासून मोफत टेस्ट सिरीज, दर्जेदार प्रश्नपत्रिका संच आणि शैक्षणिक सल्ले देऊन पालकांचा विश्वास संपादन केला गेला. ज्या पालकांची आर्थिक स्थिती ‘गब्बर’ आहे, अशा पालकांना वैयक्तिकरीत्या किंवा कोचिंग क्लासेस, एज्युकेशनल कन्सल्टन्सीच्या माध्यमातून हेरले गेल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात अनेकांनी पैसे दिले; पण त्यांना योग्य प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाही मिळाली नाही; पण आता तक्रार कुणाकडे करायची? असा प्रश्न या पालकांपुढे आहे. त्यात ‘सीबीआय’च्या चौकशीचा फेरा आपल्याकडे नको म्हणून गेले ते गेले, असे म्हणून अनेकजण मूग गिळून शांत बसले आहेत.

एकाच पेपरचे ‘मल्टिपल डिलिंग’
या प्रकरणातील सर्वांत विदारक सत्य म्हणजे यातील व्यवहाराची साखळी. गुंतवणूक मोठी असल्याने पालकांनीच या पेपरचे ‘मल्टिपल डिलिंग’ सुरू केले. एका पालकाने मुख्य सूत्रधाराकडून १० लाखांत पेपर खरेदी केला. आपले १० लाख रुपये वसूल करण्यासाठी त्या पालकाने ओळखीच्या दुसऱ्या दोन पालकांना तोच पेपर ५ - ५ लाखांत विकला. या साखळीमुळे मूळ पेपरची सत्यता तपासण्याऐवी केवळ ‘पैसे वसूल करणे’ हाच मुख्य उद्देश राहिला. पालकांनीच पालकांना गंडा घातल्याची चर्चा आता पालकांमध्ये सुरू आहे.

आलिशान हॉटेल्समधील ‘सिक्रेट डिल’
परीक्षेच्या दोन दिवस आधी या रॅकेटमधील दलाल लातूरसह विविध मोठ्या शहरामधील आलिशान हॉटेल्समध्ये सक्रिय होते. पालकांना थेट हॉटेलच्या रूममध्ये बोलावणे आणि तिथे त्यांचे मोबाइल जमा करून 'लाइव्ह' प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दाखवून व्यवहार निश्चित करणे. अर्धी रक्कम आगाऊ आणि अर्धी पेपर झाल्यानंतर, अशा अटीवर कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे परीक्षा काळात हॉटेलमध्ये थांबलेल्या परराज्यांतील ग्राहकांची चौकशी होणे गरजेचे आहे.

‘वाशिम कनेक्शन’ आणि पालकांचे पलायन!
‘सीबीआय’च्या कारवाईची चाहूल लागताच अनेक ‘बडे मासे’ रडारवर आले आहेत. पेपर विकत घेतलेल्या एका वाशिम येथील डॉक्टर पालकाने भीतीपोटी आपला मोबाइल बंद करून थेट पर्यटनाचा मार्ग धरला आहे. नांदेडमध्येही अनेक पालक अशाच प्रकारे दहशतीखाली असून, पैसे गेले तरी चालतील; पण चौकशी नको, अशी भूमिका घेत ‘नॉट रिचेबल’ झाल्याचे समजते.

तपासाची चक्रे अन् नांदेडची प्रतिमा
नांदेड हे खऱ्या अर्थाने गुणवंतांचे शहर आहे; मात्र बाहेरील टोळीने येथील हतबल पालकांच्या महत्त्वाकांक्षेला ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न केला आहे. आता सीबीआय या साखळीतील पालकांपर्यंत पोहोचणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, पालकांनी अशा शॉर्टकटच्या आहारी जाऊन स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावू नये, असे आवाहन केले जात आहे.

Web Title : NEET पेपर लीक: सीबीआई के रडार पर नांदेड़, वाशिम के अभिभावक; कई सौदे उजागर।

Web Summary : सीबीआई ने लातूर से मिले सुरागों के बाद नांदेड़ और वाशिम में NEET पेपर लीक की जांच शुरू की। आरोप है कि अमीर माता-पिता मुनाफे के लिए लीक हुए पेपर को फिर से बेचने में शामिल थे, जिससे धोखे की एक श्रृंखला बन गई। कुछ माता-पिता जांच से बचने के लिए फरार हैं।

Web Title : NEET Paper Leak: CBI Targets Nanded, Washim Parents; Multiple Deals Uncovered.

Web Summary : CBI investigates NEET paper leak in Nanded and Washim, following leads from Latur. Wealthy parents allegedly involved in reselling the leaked paper for profit, creating a chain of deceit. Some parents are now absconding to avoid investigation.