संस्थाचालक-'नीट' क्लासचालकांचे 'साटेलोटे' अन् कोट्यवधींची उलाढाल? नांदेडमध्ये 'CBI'ची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:58 IST2026-05-18T12:52:15+5:302026-05-18T12:58:05+5:30
निकालाआधीच १८० पैकी १८० गुणांचा दावा! नांदेडचा कोचिंग क्लास सीबीआयच्या रडारवर; बडे मासे भूमिगत

संस्थाचालक-'नीट' क्लासचालकांचे 'साटेलोटे' अन् कोट्यवधींची उलाढाल? नांदेडमध्ये 'CBI'ची धडक
नांदेड: नीट-युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाचे धागेधोरे आता पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी शनिवारी नांदेडात धडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) आठ अधिकाऱ्यांचे पथक दोन दिवसांच्या चौकशीनंतर मुंबईकडे रवाना झाले आहे. मात्र, जाताना त्यांनी गोळा केलेले पुरावे आणि विसंगत जबाब यामुळे नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात कोणत्याही क्षणी मोठ्या अटकेची टांगती तलवार कायम आहे.
निकालापूर्वीच 'पैशांच्या बळावर' जाहिरातबाजी?
३ मे रोजी नीटची परीक्षा पार पडली असून अद्याप कोणतीही अधिकृत उत्तरपत्रिका किंवा निकाल जाहीर झालेला नाही. असे असतानाही, नांदेडच्या वर्कशॉप परिसरातील एका नव्याने सुरू झालेल्या कोचिंग चालकाने सोशल मीडियावर थेट जाहिरातबाजी केली. आपल्या क्लासच्या दोन विद्यार्थिनींना केमिस्ट्री विषयात १८० पैकी १८० गुण मिळतील, असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता. सीबीआयने यातील एका संशयित विद्यार्थिनीची आणि तिच्या पालकांची कसून चौकशी केली असता, संशयाची सुई थेट या क्लासेसकडे वळली आहे.
संस्थाचालक अन् क्लासचालकांचे 'साटेलोटे'
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमधील एका संस्थाचालकाने आणि क्लासचालकाने मिळून ‘नीट’च्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल केल्याचा संशय आहे. जवळपास ४० ते ४५ विद्यार्थ्यांचे पेपर ‘सेट’ करण्यासाठी प्रति विद्यार्थी ५ ते १० लाख रुपयांप्रमाणे वसुली केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी या विद्यार्थिनीच्या चौकशीनंतर संबंधित क्लासचालकालाही सीबीआयने ताब्यात घेऊन चौकशी केल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे; मात्र संबंधित संचालकाने या वृत्ताचा इन्कार केला आहे.
नांदेड सोडले; पण धास्ती कायम!
शनिवारी रात्री शहरातच मुक्काम ठोकून सीबीआयच्या पथकाने रविवारी सकाळीही दोन पालकांची गुप्त ठिकाणी चौकशी केली. या दोन दिवसांच्या कारवाईत सीबीआयच्या हाती अनेक महत्त्वपूर्ण धागेदोरे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे पुरावे हाती लागल्याचे समजते. जरी पथक मुंबईकडे रवाना झाले असले, तरी अनेक बडे मासे आणि एजंट सध्या भूमिगत झाले असून आगामी दोन ते तीन दिवसांत थेट अटकेची मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.