नागपुरातील महिला जास्त असुरक्षित, गुन्हेदरात मुंबई-पुण्यालाही टाकले मागे
By योगेश पांडे | Updated: May 8, 2026 16:50 IST2026-05-08T16:49:43+5:302026-05-08T16:50:09+5:30
Nagpur : नागपुरातील गुन्हे मागील काही वर्षांपासून नियंत्रणात असल्याचा दावा पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील महिला सुरक्षेचा मुद्दा चिंताजनक झाला आहे. मुंबई- पुण्यापेक्षा नागपुरातील महिला जास्त असुरक्षित असून, शहरातील गुन्हेदर सर्वात जास्त आहे.

Women in Nagpur are more unsafe, leaving behind Mumbai and Pune in crime rate
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील गुन्हे मागील काही वर्षांपासून नियंत्रणात असल्याचा दावा पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील महिला सुरक्षेचा मुद्दा चिंताजनक झाला आहे. मुंबई- पुण्यापेक्षा नागपुरातील महिला जास्त असुरक्षित असून, शहरातील गुन्हेदर सर्वात जास्त आहे. याशिवाय शहरातील महिला अत्याचाराचा दरदेखील या दोन्ही मोठ्या शहरांपेक्षा अधिक आहे. 'एनसीआरबी'च्या (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो) नुकत्याच प्रकाशित झालेल्या २०२४ सालच्या अहवालातून हे दाहक वास्तव समोर आले आहे.
'लोकमत'ला मिळालेल्या आकडेवारीनुसार २०२४ साली नागपुरात महिलांविरोधातील एकूण १ हजार ५१३ गुन्ह्यांची नोंद झाली. मुंबईत हाच आकडा ६ हजार ३५८ व पुण्यात २ हजार ६३१ इतका होता.
लोकसंख्येच्या हिशेबाने नागपुरातील महिलांविरोधातील गुन्ह्यांचा दर प्रति एक लाख लोकसंख्येमागे १२३.८ इतका होता. मुंबईत हाच दर ७४.६, तर पुण्यात ११०.१ इतका होता. देशातील प्रमुख शहरांतील गुन्हे दरांकडे नजर टाकली तर नागपूरचा क्रमांक देशात सातवा होता.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा दर देशात तिसरा : नरसापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येनंतर पॉक्सोअंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा मुद्दा चर्चेला आला आहे. २०२४ साली नागपुरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे २७३ गुन्हे दाखल झाले व गुन्हे दर २२.३ इतका होता. देशात नागपूरहून समोर केवळ इंदूर (२९.९) व पुणे (२४.१) हीच मोठी शहरे होती.
महिला अत्याचाराचा दर ११.१ : सन २०२४मध्ये नागपुरात १३६ अत्याचारांच्या घटनांची नोंद झाली. महिला अत्याचाराचा दर ११.१ इतका होता. देशात अत्याचारांच्या दरात नागपूरचा पाचवा क्रमांक आहे व राज्यात मुंबई (४.८) तसेच पुणे (१०.१) याहून अधिक गुन्हे दर नागपूरचाच होता. महिला अत्याचारांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पटना, कानपूरपेक्षा नागपूरचा महिला अत्याचारांचा गुन्हे दर खूप जास्त दिसून आला.
महिला, तरुणींवर विखारी नजर
घराबाहेर निघालेल्या अनेक तरुणी व महिलांना विकृत पुरुषांच्या विखारी नजरांचा सामना करावा लागतो. अनेक महिलांना विनयभंगांच्या दुर्दैवी घटनांचादेखील अनुभव येतो. २०२४ सालच्या आकडेवारीनुसार नागपुरात विनयभंगाचे १४६ गुन्हे नोंदविण्यात आले व गुन्ह्यांचा दर ११.९ इतका होता. मुंबईचा विनयभंग गुन्ह्यांचा दर १०.१, तर पुण्यातील दर ९.३ इतका होता. विनयभंगाच्या गुन्हे दरात नागपूरचा देशात चौथा क्रमांक होता.
लैंगिक छळवणुकीत नकोसा तिसरा क्रमांक
महिला - तरुणींच्या लैंगिक छळवणुकीच्या घटनांमध्ये नागपूरचा २०२४मध्ये देशात तिसरा क्रमांक होता. नागपुरात याअंतर्गत २६ गुन्ह्यांची नोंद झाली व गुन्हेदर ७.९ इतका होता. मुंबईत हाच दर ३.४ व पुण्यात ६.७ इतका होता.
शेकडो महिलांचा पाठलाग
शहरात अनेक रोडरोमियोंकडून महिला व तरुणींचा पाठलागदेखील करण्यात येतो. २०२४ मध्ये याबाबतदेखील डोळ्यात अंजन टाकणारी आकडेवारी समोर आली आहे. शहरात वर्षभरात पाठलाग करण्याचे १०१ गुन्हे दाखल झाले व गुन्ह्यांचा दर ८.३ इतका होता. पाठलाग करण्याच्या गुन्हेदरात इंदूर व हैदराबाद या शहरांनंतर नागपुरचाच देशात क्रमांक होता.