घरकामासाठी आल्या कपाट ‘साफ’ करून गेल्या

By Admin | Updated: June 29, 2014 00:43 IST2014-06-29T00:43:08+5:302014-06-29T00:43:08+5:30

घरकामासाठी आलेल्या तिघींनी घरातील रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाखांचा ऐवज लंपास केला. जरीपटक्यातील सौंदर्य टॉवरमध्ये संगीता रामस्वरूप नागपाल (वय ५२) यांच्याकडे

The 'wipe' for the house-to-house 'clean' went past | घरकामासाठी आल्या कपाट ‘साफ’ करून गेल्या

घरकामासाठी आल्या कपाट ‘साफ’ करून गेल्या

जरीपटका, सदरमधील घटना : अंबाझरीतही चोरी
नागपूर : घरकामासाठी आलेल्या तिघींनी घरातील रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाखांचा ऐवज लंपास केला. जरीपटक्यातील सौंदर्य टॉवरमध्ये संगीता रामस्वरूप नागपाल (वय ५२) यांच्याकडे २५ जूनला सायंकाळी ममता, अमृता आणि अन्य एक मुलगी कामाला आली. या तिघींना संगीताची बहीण सुषमा यांनी घरकामासाठी पाठविले होते. २५, २६ आणि २७ जूनच्या दुपारी २ ते ३ या वेळेत उपरोक्त तिघींनी घरकाम केले.
२७ जूनच्या सायंकाळी संगीता यांनी शयनकक्षातील कपाट उघडून पाहिले असता त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख तीन हजार असा ५ लाख, ९२ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरकामासाठी आलेल्या त्या तिघींचा या चोरीत हात असावा, असा संशय आहे. संगीता यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्या तिघींचा शोध घेतला जात आहे.
सदरमध्येही अशीच घटना घडली. गीता अश्विन टेहलानी (वय ४८) यांचा पूनम चेंबरमागे बंगला आहे. त्यांनी घरकामाला ठेवलेल्या दोन महिलांनी शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १२.३० या वेळेत टेहलानी यांच्या शयनकक्षातील कपाटातून दोन लाखांचे दागिने आणि दोन हजार रुपये चोरून नेले.
सदर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. संशयित महिलांचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)
अंबाझरीतही हात साफ
अंबाझरी टेकडी येथील समता लेआऊटमध्ये विजयालक्ष्मी भास्करराव नायडू (वय ५६) यांच्या घरी शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास सोन्याचे दागिने आणि रोख सात हजार असा एकूण एक लाख, सात हजारांचा ऐवज चोरीला गेला. विशेष म्हणजे, विजयालक्ष्मी नायडू यांच्या घरातून चोरट्याने ज्यावेळी हा ऐवज चोरून नेला, त्यावेळी त्या टीव्ही बघत होत्या. दार उघडे असल्यामुळे चोरट्याने आपला डाव साधला आणि निघूनही गेला. नायडू यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: The 'wipe' for the house-to-house 'clean' went past