लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागपूर विभागात सरासरीच्या ९२ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, कमी पावसाची शक्यता असतानाही काही भागांत अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हास्तरावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले.
मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जलसंपदा, ग्रामविकास, कृषी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डाॅ.विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, हवामान विभागाचे शास्त्रज्ञ बालसुब्रमणियम, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे आदी उपस्थित होते.
हवामान विभागाने १० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होण्याचा अंदाज व्यक्त केला असून गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत सर्वाधिक पर्जन्यमान नोंदविले जाण्याची शक्यता आहे. काही भागांत अतिवृष्टी तर काही भागांत कोरडे कालखंड निर्माण होऊ शकतात, असेही बैठकीत सांगण्यात आले.
विभागीय आयुक्तांनी वैनगंगा नदी,कन्हान नदी आणि पेंच नदीचे खोरे पुरासाठी संवेदनशील असल्याचे नमूद केले. चौराई प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी वैनगंगा नदीवरील प्रकल्पांपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ३९ तास लागतात. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आंतरराज्य प्रकल्पांमध्ये समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अशा करा उपाययोजना
- आपत्ती व्यवस्थापनासाठी नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवा
- संपर्क यंत्रणा सक्षम करा
- चॅटबॉटचा प्रभावी वापर करावा
- जलसाठ्यातील पाण्याचे योग्य नियोजन करावे
- मागील तीन वर्षांचा आढावा घेऊन पूरग्रस्त व संवेदनशील गावांची ओळख निश्चित करा.
- स्थलांतर करावे लागणाऱ्या गावांतील गर्भवती महिला व आरोग्यविषयक गरजांचे नियोजनावर भर द्या.
- अशा गावांमध्ये औषधे, अन्नधान्य, सर्पदंशावरील औषधे आणि साप पकडणारी यंत्रणा उपलब्ध ठेवा
- सिंचन प्रकल्प व नद्यांलगतच्या धोकादायक स्थळांवर माहिती फलक लावा. - केंद्रीय जल आयोगाकडून पूरस्थितीबाबत नियमित बुलेटिन जारी होणार
- शहरातील खोलगड भागावर ड्रोनने लक्ष
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी सांगितले की, नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी तसेच शहरातील २२७ नाल्यांची तपासणी पूर्ण झाली असून गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या काळात शहरातील खोलगट भागांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Web Summary : El Nino's impact may cause less than average rainfall in Nagpur. Authorities are preparing for potential floods despite the overall deficit. Key measures include 24/7 control rooms, efficient communication, and strategic water management, focusing on vulnerable areas and stocking essential supplies.
Web Summary : अल नीनो के प्रभाव से नागपुर में औसत से कम वर्षा हो सकती है। अधिकारी संभावित बाढ़ के लिए तैयारी कर रहे हैं। मुख्य उपायों में 24/7 नियंत्रण कक्ष, कुशल संचार और रणनीतिक जल प्रबंधन शामिल हैं, जो कमजोर क्षेत्रों पर ध्यान केंद्रित करते हैं।