लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील जलवृद्धीच्या अभ्यासाकरिता बेसलाइन सर्वे, रिमोट सेंसिंग, वॉटर बॅलन्स, हायड्रोजिओलॉजीकल इन्व्हेस्टिगेशन अॅण्ड बोरवेल इन्व्हेंटरी आणि ट्रेसर टेस्टिंग अॅण्ड इंटिग्रेटेड मॉडेलिंग या चाचण्या करण्याची गरज असल्याची सूचना व्हीएनआयटीचे डॉ. अविनाश वासुदेव यांनी केली आहे.
यासंदर्भात अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन विशेष समितीची २३ एप्रिल २०२६ रोजी बैठक झाली. त्यावेळी जलवृद्धीची कारणे आणि उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या बैठकीचे इतिवृत्त बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले.
त्यानुसार, वासुदेव यांच्याप्रमाणेच नीरीचे वैज्ञानिक डॉ. रघुवंशी राम यांनी जलवृद्धीसाठी वाढलेला पाऊस, भूजलाचा वाढलेला ओघ, बाष्पीभवनाचा कमी झालेला दर व पाणलोट क्षेत्रातील मानवी हस्तक्षेप या बाबी कारणीभूत असू शकतात, असे नमूद केले तर, केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता योगेश भिसे यांनी सरोवराजवळ काही नवीन भूजल स्रोत तयार झाले आहे का, याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे सांगितले. बेसाल्ट खडकांवर पडलेल्या उल्केमुळे तयार झालेले हे जगातील दुर्मीळ 'मेटिओराइट क्रेटर' मानले जाते. गेल्या काही महिन्यांपासून सरोवरातील पाण्याचे चार स्रोत अखंड वाहत असल्याने पाण्याची पातळी सतत वाढत आहे.
याचिका प्रलंबित
उच्च न्यायालयाने यासंदर्भात आवश्यक आदेश देण्यासाठी स्वतःच जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व राज वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने बैठकीचे इतिवृत्त रेकॉर्डवर घेऊन येत्या १० जून रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. अॅड. मोहित खजांची यांनी न्यायालयमित्र म्हणून कामकाज पाहिले.
Web Summary : Experts suggest tests to understand the increasing water level in Lonar Lake. Increased rainfall, groundwater flow, and reduced evaporation could be factors. Further study of new groundwater sources near the lake is also needed. The High Court has scheduled a hearing for June 10.
Web Summary : विशेषज्ञों ने लोनार झील में बढ़ते जल स्तर को समझने के लिए परीक्षणों का सुझाव दिया है। बढ़ी हुई वर्षा, भूजल प्रवाह और कम वाष्पीकरण कारक हो सकते हैं। झील के पास नए भूजल स्रोतों का अध्ययन भी आवश्यक है। उच्च न्यायालय ने 10 जून को सुनवाई निर्धारित की है।