विदर्भात वाघ वाढले!

By Admin | Updated: May 24, 2014 01:02 IST2014-05-24T01:02:32+5:302014-05-24T01:02:32+5:30

एकिकडे देशातील वाघांची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना, विदर्भांतील वाघांच्या संख्येत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. याचाच एक

Vidarbha tiger grew! | विदर्भात वाघ वाढले!

विदर्भात वाघ वाढले!

प्रगणना रिपोर्ट : एकाच दिवशी २९ वाघांचे दर्शन

नागपूर : एकिकडे देशातील वाघांची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असताना, विदर्भांतील वाघांच्या संख्येत मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. याचाच एक भाग म्हणून बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर अभयारण्यात २९ वाघांचे दर्शन झाले आहे. यात पेंच व्याघ्र प्रकल्पात १३, उमरेड-कºहांड अभयारण्यात ७, बोर अभयारण्यात ५ व टिपेश्वर अभयारण्यात ४ वाघांची नोंद करण्यात आली आहे. यावरून विदर्भातील वाघांची संख्या वाढल्याचे संकेत मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वन्यजीव विभागाच्यावतीने गत १४ मे रोजी बुद्ध पौर्णिमेला पेंच व्याघ्र प्रकल्पासह सर्व अभयारण्यात वन्यजीव प्रगणना आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे ३५० वन्यजीव व निसर्गप्रेमींसह वन विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. त्या प्रगणनेच्या अधिकृत रिपोर्टनुसार विदर्भातील जंगलात २९ वाघांसह १५ बिबट, १ तडस, १ चांदी अस्वल, ११५ रान कुत्री, १३ रान मांजर, ५२ अस्वल, ७९ कोल्हे, १७ चौसिंगा, २२९ भेडकी, १२४ माकड (लाल तोंडाचे), ३०४२ लंगूर, ८८७ सांबर, २४७ गवा (गौर), १४६४ रान डुक्कर, ३,४२२ चितळ, ९४६ नीलगायी, १९ मसन्या उद (पाम सिव्हेट), २१ सायाळ, १० गिधाड, ३ मगर, ३५ मुंगूस, ५५ ससे, ६१८ मोर, १८ लांडगे, ८ चिंकारा व १० काळविटांची नोंद करण्यात आली आहे. वन विभागाच्या या अहवालानुसार इंडियन सिव्हेट व खवले मांजर कुठेही आढळून आले नाही. त्यामुळे या दोन प्रजाती नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु त्याचवेळी वाघ व बिबट्याच्या वाढत्या संख्येवर समाधान व्यक्त केले जात आहे. गत काही दिवसांपासून नागपूरला ‘व्याघ्र राजधानी’ चा दर्जा देण्याची मागणी रेटली जात आहे. त्यात वाघांची ही वाढलेली संख्या निश्चितच भर घालणारी आहे. विशेष म्हणजे, व्याघ्र प्रकल्प व अभयारण्याशिवाय प्रादेशिक विभागाच्या वन परिक्षेत्रातही अनेक वाघ व बिबट्यांचा अधिवास असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे काही जाणकार विदर्भातील एकूण वाघांची संख्या शंभरावर पोहोचण्याची आशा व्यक्त करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha tiger grew!