तूर डाळ आणखी महाग

By Admin | Updated: September 5, 2016 02:25 IST2016-09-05T02:25:18+5:302016-09-05T02:25:18+5:30

सप्ताहापूर्वी किरकोळमध्ये दर्जानुसार ८० ते १०० रुपयांपर्यंत उतरलेली तूर डाळ सध्या १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे.

Tur dal is even more expensive | तूर डाळ आणखी महाग

तूर डाळ आणखी महाग

व्यापाऱ्यांची साठेबाजी : शासनाने कारवाई करण्याची मागणी
नागपूर : सप्ताहापूर्वी किरकोळमध्ये दर्जानुसार ८० ते १०० रुपयांपर्यंत उतरलेली तूर डाळ सध्या १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे. व्यापाऱ्यांकडे जास्त दरातील डाळीचा साठा उपलब्ध असल्यामुळे व्यापारी दर कमी करण्यास तयार नाहीत. व्यापाऱ्यांची साठेबाजी दरवाढीस कारणीभूत असल्याचे समजले जात आहे. सणासुदीत सप्ताहापूर्वी सामान्यांना खरेदी करता येईल, अशा स्तरावर भाव आल्यानंतर व्यापाऱ्यांनी अचानक भाववाढ का केली, याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे. अन्न वितरण अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांकडील साठा तपासून आणि प्रसंगी जप्त करून सणांमध्ये मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध करून देण्याची मागणी विविध ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केली.


चणा डाळ १२० रुपये किलो
नागपूर : चणा डाळीच्या किमतीतही प्रति किलो २० रुपयांची वाढ झाली आहे़ सप्ताहापूर्वी ८० ते १०० रुपये किलो असलेली चणा डाळ आता १०० ते १२० रुपयांवर पोहोचली आहे. अन्य डाळींमध्ये प्रति क्विंटलमागे ४०० ते १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. मूंग मोगर दर्जानुसार ६५ ते ७० रुपये किलो, मूंग ६० ते ७०, मसूर डाळ ७० ते ८०, उडीद मोगर १२० ते १५०, हिरवा वाटाणा ३५ ते ५०, काबुली चणा दर्जानुसार ११० ते १५० रुपये किलो आहे. भाववाढीमुळे खरेदीला ब्रेक लागला आहे. छोटे दुकानदार आणि ग्राहकांनी खरेदी थांबविली आहे. ग्राहक केवळ सणांपुरतीच खरेदी करीत असल्याची माहिती धान्य बाजाराचे समीक्षक व एजंट रमेश उमाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली.(प्रतिनिधी)

गहू व तांदूळ वधारले
यावर्षी विदर्भात पुरेशा पाऊस न पडल्याने गहू आणि तांदळाच्या किमतीत वाढ झाली आहे. गहू क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी वधारला आहे. बाजारात लोकवन २५ रुपये किलो, तुकडा २७ रुपये, एमपी बोट २८ ते ३५ रुपये किलो आहे. याशिवाय दर्जानुसार तांदळाच्या किमतीत प्रति क्विंटल २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. चिन्नोर ५० ते ५५ रुपये किलो, श्रीराम ५० रुपये, सुवर्णा २५ ते २८, बीपीटी ३२ ते ३४, एचएमटी ३७ ते ४० रुपये किलो दराने विक्रीस आहेत. कुटुंबातील प्रत्येकाचा मोबाईल, वाहन आणि इतर खर्च पाहता स्वयंपाकघरातील वस्तूंच्या किमती आटोक्यात आहेत. भाज्याही स्वस्त आहेत. गृहिणींनी महागाई वाढल्याची ओरड न करता इतर खर्चावर नियंत्रण आणण्याचे आवाहन रमेश उमाटे यांनी केले.

Web Title: Tur dal is even more expensive