‘न थकणाऱ्या’ राजांची गाेष्ट !

By राजेश शेगोकार | Updated: May 2, 2026 20:39 IST2026-05-02T20:38:37+5:302026-05-02T20:39:58+5:30

Nagpur Article : सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत, डोळ्यांत स्वराज्याचे स्वप्न घेऊन, पायांत वादळाची गती असलेले छत्रपती श्री शिवाजी राजे हे उभ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे उर्जास्थान... ही संजीवन उर्जा आजही महाराष्ट्राला एका धाग्यात बांधते.

The story of 'untiring' kings! | ‘न थकणाऱ्या’ राजांची गाेष्ट !

The story of 'untiring' kings!

राजेश शेगोकार 
नागपूर : सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत, डोळ्यांत स्वराज्याचे स्वप्न घेऊन, पायांत वादळाची गती असलेले छत्रपती श्री शिवाजी राजे हे उभ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे उर्जास्थान... ही संजीवन उर्जा आजही महाराष्ट्राला एका धाग्यात बांधते. अठरापगड जातीमध्ये त्यांचे ‘राजेपण’ डाेक्यावर व डाेक्यात घेऊन मिरवले जाते, कारण ते जाणते राजे हाेते. ऐन तारूण्यातच त्यांनी तोरणा जिंकला, राजगड उभा केला आणि स्वराज्याची पहिली पायाभरणी केली. प्रत्येक किल्ला म्हणजे एक लढाई, प्रत्येक लढाई म्हणजे एक नवा निर्धार. प्रतापगडाच्या पायथ्याशी बलाढ्य, कपटी आणि गर्विष्ठ अफजलखान उभा होता. पण बुद्धिमत्ता आणि अचूक नियोजनाच्या बळावर त्यांनी संकटालाच संधीत रूपांतरित केले. संकटे समोर आली, शत्रू डोळे वटारून उभा राहिला, तरी हे राजे कधी डगमगले नाहीत, कधी थकले नाहीत.  

पन्हाळगडातून सुटताना रात्र काळोखी होती, वाट धोक्यांनी भरलेली. सोबत होते काही मोजके मावळे, आणि दूरवर विशाळगडाची आशा. त्या प्रवासात बाजी प्रभूंनी जीव ओवाळून टाकला, पण राजांची चाल थांबली नाही.  आग्रा मुघल दरबाराची कोंडी, नजरकैद, आणि मृत्यूची सावली. पण औरंगजेबाच्या बंदोबस्तातूनही राजे सुटले.  वर्षानुवर्षांच्या अथक संघर्षानंतर रायगडावर राज्याभिषेक झाला. सोनेरी सिंहासन, जल्लोष, आणि अभिमानाचा क्षण. पण या सगळ्यांतही ते थांबले नाहीत. राज्य उभं करणं जितकं कठीण, तितकंच ते टिकवणंही अन् ते त्यासाठी पुन्हा झटत राहिले... हाच इतिहास शिकत अनेक पिढ्या घडल्या. पण धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम आता नव्याने इतिहास लिहू पाहत आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी राज्य समर्थ रामदास स्वामी यांना सांभाळण्याची विनंती केली, असा दावा धीरेंद्र शास्त्रींनी केला. त्यांचा हा दावा केवळ वादग्रस्त नाही, तर इतिहासाच्या मूलभूत सत्यालाच छेद देणारा आहे.     

अलीकडच्या काळात धार्मिक व राजकीय व्यासपीठांवरून इतिहासाचे ‘नवे अर्थ’ लावण्याची एक धोकादायक प्रवृत्ती वाढताना दिसते आहे. शिवछत्रपतींच्या आयुष्याचा मागोवा घेतला, तर ‘थकलेला राजा’ ही कल्पनाच फोल ठरते. त्यांचा दावा इतिहासाच्या कोणत्या पुराव्यावर आधारित आहे? यांचा संदर्भ धीरेंद्र शास्त्रींनी दिला नाही. मुळात हा प्रकार अज्ञानाचाच नाही तर जाणूनबुजून केलेल्या विकृतीकरणाचा आहे. 

  अनेक इतिहास संशोधनाच्या दृष्टीने पाहिले, तर शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचे नाते हे गुरु-शिष्याचे नव्हते त्यामुळे राज्यकारभार हस्तांतरित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवछत्रपतींनी १६७४ मध्ये विधिवत राज्याभिषेक करून स्वराज्याला राजकीय वैधता दिली होती. हे राज्य त्यांनी प्रजेसाठी उभे केले होते ते कोणालाही ‘दान’ करण्याचा प्रश्नच नव्हता. केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी धीरेंद्र शास्त्रींनी इतिहासाशी असा खेळ केला की जाणीवपूर्वक नवा इतिहास पेरण्याची ही कुटनिती आहे? इतिहास हा भावनांचा नव्हे, तर पुराव्यांचा विषय आहे. तो बदलता येत नाही, फक्त समजून घ्यावा लागतो. शिवछत्रपतींचे कार्य इतके भव्य आहे की त्याला कोणत्याही काल्पनिक कथा किंवा दाव्यांची गरज नाही. शिवाय हा महाराष्ट्र आहे, येथे छत्रपतींचा विचार व इतिहास संजीवन आहे.   या मातीत स्वराज्याचा स्वाभिमान रुजलेला आहे. भूमीत धीरेंद्र शास्त्रींसारख्या प्रवृत्ती उगवू शकतात, पण टिकू शकत नाहीत.

गैरसाेयीची अभिव्यक्ती अन् साेयीचे स्वातंत्र्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शिवाजी काेण हाेता?’ या पुस्तकावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायाकवाड यांनी थेट पुस्तकाचे प्रकाशकांना धमकीचा फाेन केला व ताे व्हायरल झाल्यावर महाराष्ट्रभर निषेधाचे वादळ उठले. काहींनी गायकवांडांची साेयीनुसार पाठराखणही केली. गायकवाडांनी नंतर दिलगिरी व्यक्त करून पडदा टाकण्याचाही प्रयत्न केला. पण या वादात गायकवाडांसह त्यांची पाठराखण करणाऱ्यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या शिवछत्रपतींबाबतच्या वादग्रस्त विधानावर मात्र चुप्पी साधली? तेथे ना संताप, ना निषेध, ना भूमिका! म्हणजे पुस्तकातले विचार ‘गैरसोयीचे’ वाटले की आक्रमक अभिव्यक्ती, आणि धार्मिक व्यासपीठावरून इतिहासाला वाकवणारे विधान ‘सोयीचे’ वाटले की मौन ही कोणती दुटप्पी भूमिका? हे एकच उदाहरण नाही; अलीकडच्या काळात ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या संकल्पनेचं सोयीस्कर तुकडे करणं सुरू आहे. आपल्या विचारांना पूरक असेल तेव्हा स्वातंत्र्याचा गजर, आणि विरोधी असेल तेव्हा त्याच स्वातंत्र्याला गळा घोटण्याची तयारी ही प्रवृत्ती धोकादायक आहे. अभिव्यक्ती म्हणजे फक्त आवाज उठवणं नाही, तर सातत्याने आणि तत्त्वनिष्ठ भूमिका घेणं. नाहीतर ते स्वातंत्र्य नसून, सोयीचा मुखवटा ठरतो.

Web Title : कभी न थकने वाले राजा की कहानी: शिवाजी महाराज

Web Summary : शिवाजी महाराज थक गए थे और रामदास स्वामी से राज्य संभालने को कहा, धीरेंद्र शास्त्री का दावा झूठा है। शिवाजी का जीवन अन्यथा साबित करता है, और इतिहास को सुविधा के लिए नहीं तोड़ा जाना चाहिए। स्वतंत्रता की अभिव्यक्ति का दुरुपयोग हो रहा है, और चयनात्मक आक्रोश हानिकारक है।

Web Title : The Story of a King Who Never Tired: Shivaji Maharaj

Web Summary : Dhirendra Shastri's claim that Shivaji Maharaj tired and asked Ramdas Swami to take over the kingdom is false. Shivaji's life proves otherwise, and history shouldn't be twisted for convenience. Expression of freedom is being misused, and selective outrage is harmful.