'श्रीलंका शांत; पण जनतेत असंतोष कायम' श्रीलंकेचे माजी मंत्री डॉ. विजयदासा राजापाक्षे यांचे विधान
By आनंद डेकाटे | Updated: May 16, 2026 19:37 IST2026-05-16T19:34:17+5:302026-05-16T19:37:55+5:30
Nagpur : श्रीलंकेत सध्या परिस्थिती शांत दिसत असली तरी जनतेमध्ये असंतोष कायम असून नागरिकांना स्थिरता, विकास आणि प्रभावी नेतृत्वाची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेचे माजी मंत्री, राष्ट्रपतींचे कायदेशीर सल्लागार आणि श्रीलंका फ्रीडम पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. विजयदासा राजापाक्षे यांनी केले.

'Sri Lanka is peaceful; but dissatisfaction remains among the people', says former Sri Lankan minister Dr. Vijayadasa Rajapaksa
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रीलंकेत सध्या परिस्थिती शांत दिसत असली तरी जनतेमध्ये असंतोष कायम असून नागरिकांना स्थिरता, विकास आणि प्रभावी नेतृत्वाची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेचे माजी मंत्री, राष्ट्रपतींचे कायदेशीर सल्लागार आणि श्रीलंका फ्रीडम पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. विजयदासा राजापाक्षे यांनी केले. नागपुरात आयोजित जागतिक शांतता परिषदेदरम्यान शनिवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि बौद्ध विचारवंत म्हणून ओळख असलेले डॉ. राजापाक्षे हे गेल्या तीन दशकांपासून श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे कायदेशीर आणि धोरणात्मक सल्लागार राहिले आहेत. त्यांनी विधी, शिक्षण, बौद्धसासन, कामगार आणि तुरुंग सुधारणा यांसारखी महत्त्वाची मंत्रालयेही सांभाळली आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूकही त्यांनी लढविली होती. श्रीलंकेतील आर्थिक संकटासाठी तत्कालीन राष्ट्रपती आणि सरकारची चुकीची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप करताना डॉ. राजापाक्षे म्हणाले की, “सरकारला वेळोवेळी धोरणात्मक बदलांचे सल्ले देण्यात आले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी देश आर्थिक डबघाईला आला आणि जनतेचा संताप उफाळून आला.” अनेक चुकीच्या निर्णयांमुळे शांतताप्रिय बौद्ध देशाला हिंसाचाराचा सामना करावा लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, “निवडणुका झाल्यानंतर परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी सध्याचे नेतृत्वही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे आगामी काळात श्रीलंकेत पुन्हा राजकीय बदल आणि निवडणुकांचे संकेत दिसत आहेत.” यावेळी श्रीलंकेच्या अमरपुरा महा निकायाचे महानायक थेरो मदमपग्मा अस्साजी थिस्सा, भंते देवमित्ता, किरण महल्ले, नितीन गजभिये, स्मिता वाकडे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव
१९५० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेत जागतिक बौद्ध परिषदेसाठी आले होते, याची आठवण करून देताना डॉ. राजापाक्षे म्हणाले की, “नंतर नागपुरात त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि वैशाख दिनाला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठीही पुढाकार घेतला.
संकटकाळात भारताची मदत महत्त्वाची
श्रीलंकेत आर्थिक आणि राजकीय संकट निर्माण झाल्यानंतर भारताने मोठे आर्थिक आणि मानवतावादी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. “रुग्णसेवा, पायाभूत सुविधा आणि ५०० रुग्णवाहिका उपलब्ध करून भारताने श्रीलंकेला मोठा आधार दिला,” श्रीलंकेतील बंदर चीनकडे देण्याच्या निर्णयाला विरोध करत आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा खुलासाही डॉ. राजापाक्षे यांनी केला.