लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (ट्रिपल आयटी) नागपूरच्या बुटीबोरी येथील कॅम्पसमध्ये घडलेल्या श्रेयश माने विद्यार्थ्याच्या या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पहाटे ४ वाजता नवव्या माळ्यावरून उडी घेतल्यानंतर प्रशासनाला सुचित करूनही अनेक तास त्याचा देह तसाच पडून होता. दुसरीकडे जागतिक दर्जाची ही संस्था नागपूर शहरापासून २२ किलोमीटर दूर असूनही येथे आकस्मिक स्थितीसाठी कुठलीच वैद्यकीय सुविधा नाही किंवा रुग्णवाहिकेची व्यवस्थासुद्धा नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
कोल्हापूर येथील रहिवासी व ट्रिपल आयटी, नागपूरला द्वितीय वर्षाचा विद्यार्थी श्रेयस चंद्रकांत माने (२१) याने सोमवारी पहाटे सुमारे ४ वाजता वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर झालेले घटनाक्रम व संस्थेच्या प्रशासकीय असंवेदनशीलतेमुळे सोमवारी सांयकाळी विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश उफाळून आला. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, पहाटे ४.३० वाजताच प्रशासनाला माहिती देण्यात आली होती; मात्र सकाळी ६ वाजेपर्यंत कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्याबाबत 'इमर्जन्सी रिस्पॉन्स' सक्रिय झाला नाही.
अगदी सकाळी पोलिस दाखल होईपर्यंत संस्थेचे कोणत्याही अधिकाऱ्याने वैद्यकीय सुविधा पोहोचविण्यासाठी सक्रियता दाखवली नाही. सर्वाधिक धक्कादायक म्हणजे दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे ७ ते ८ तास श्रेयशचा मृतदेह परिसरातच पडून होता. प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतरही श्रेयस जिवंत आहे का, त्याचे श्वास सुरू आहेत का, याची तपासणी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला नाही. त्याला तातडीने रुग्णालयात नेऊन वाचवता आले असते का, याकडेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
दुसरी गंभीर बाब म्हणजे या मानांकित संस्थेत असलेला सुविधांचा अभाव. ट्रिपल आयटी संस्था नागपूरपासून २२ किलोमीटर दूर आहे आणि जवळचे बुटीबोरी हे औद्योगिक ठिकाणही इथून १५ किलोमीटर दूर आहे. संस्थेच्या वसतिगृहामध्ये १०००च्या वर विद्यार्थी वास्तव्यास आहेत. या संस्थेत एखाद्या आकस्मिक प्रसंगी वैद्यकीय सुविधा असणे अत्यावश्यक आहे.
परीक्षा पुढे ढकलली, समितीही नेमली
मिळालेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी संचालक प्रा. प्रेम लाल पटेल सोमवारी सायंकाळी संस्थेत पोहोचले. त्यांच्या उशिरा पोहोचल्यानेही विद्यार्थ्यांमध्ये रोष होता. हा संताप बघता प्रशासनाने परीक्षा दोन दिवसांसाठी पुढे ढकलल्या. यासह घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली.
श्रेयशला होती समुपदेशनाची गरज
पोलिस तपासानुसार, श्रेयसच्या सेमिस्टर परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार होत्या आणि अभ्यास पूर्ण न झाल्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. तो अनेक दिवसांपासून कॉलेजलाही गेला नव्हता, अशी माहिती आहे. अशावेळी शिक्षकांनी किंवा तज्ज्ञांनी त्याचे समुपदेशन करून अडचण जाणली असती, तर त्याचा मानसिक तणाव कमी होऊ शकला असता. म्हणूनच यूजीसीने विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी उच्च तंत्रज्ञान संस्थांमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
Web Summary : Shreyas Mane's suicide at IIIT Nagpur exposes the lack of medical facilities. Apathy and delayed response to the incident sparked student outrage. No ambulance or immediate aid was available, raising concerns about the institute's emergency preparedness and sensitivity. Exams postponed; committee formed.
Web Summary : श्रेयस माने की आत्महत्या ने ट्रिपल आईटी नागपुर में चिकित्सा सुविधाओं की कमी उजागर की। घटना पर उदासीनता और विलंबित प्रतिक्रिया से छात्रों में आक्रोश है। एम्बुलेंस या तत्काल सहायता उपलब्ध नहीं थी, जिससे संस्थान की आपातकालीन तैयारी पर सवाल उठे। परीक्षाएं स्थगित; समिति गठित।